कृषी सेवक | १७ नोव्हेंबर २०२२ |इमू रॅटाइट समूहाचे घटक आहेत आणि त्यांचे मांस, अंडी, तेल, त्वचा आणि पंख ह्यांचे आर्थिक मूल्य उच्च आहे. हे पक्षी विविध हवामान व परिस्थितीशी जुळवून घेतात. इमू आणि शहामृग हे दोन्ही पक्षी भारतात सादर झाले असले तरी इमू संवर्धनास जास्त महत्व प्राप्त झाले आहे.
म्हणजेच उडू न शकणार्या पक्ष्यांचे पंख विकसित नसतात आणि ह्यांमध्ये इमू, शहामृग, रिया, कॅसोवरी आणि किवी समाविष्ट आहेत. इमू आणि शहामृग व्यापारी महत्वाचे पक्षी असून त्यांचे मांस, तेल, त्वचा आणि पंख ह्यांना चांगला बाजारभाव आहे. ह्या पक्ष्यांची रचनात्मक आणि शारीरिक वैशिष्ट्ये समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीसाठी उपयुक्त अशी आहेत. शेतावरील मोकळ्या तसेच अर्धबंदिस्त पध्दतींद्वारे यथोचित प्रकारे उच्च तंतुमय आहार देऊन ह्या पक्ष्यांना वाढवता येते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन इम्यु संवर्धनात आघाडीवर आहेत. इम्यु पक्षी भारतीय हवामानाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.
इमूची वैशिष्ट्ये
इमूची मान लांब असते, तुलनेने लहान बोडके डोके, पायांना तीन बोटे आणि शरीर पिसांनी झाकलेले असते. सुरूवातीला ह्या पक्ष्यांच्या अंगावर उभ्या पट्ट्या असतात (वय 0-3 महिने) मग हळू-हळू 4-12 महिन्यांत त्या भुर्या रंगाच्या होतात. प्रौढ पक्ष्यांची बोडकी मान निळी तर शरीरावर नक्षीदार पिसे असतात. प्रौढ पक्ष्याची उंची सुमारे 6 फूट असून 45-60 किलो वजन असते. खवल्यांसारची त्वचा असलेले लांबलचक पाय कडक आणि कोरड्या मातीकरिता योग्य आहेत. इम्यु चे नैसर्गिक अन्न किटक, वनस्पतींची कोवळी पाने, आणि केरकचरा आहे. हे पक्षी गाजर, काकडी, पपई इत्यादींसारख्या भाज्या आणि फळे खातात. ह्यांमधील मादी आकाराने जास्त मोठी तसेच वर्चस्व गाजविणारी असते, विशेषत: प्रजनन काळात. इम्यु 30 वर्षे जगतात. आणि 16 वर्षांपेक्षा जास्त काळ ते अंडी देतात. पक्ष्यांचा कळप किंवा जोड्या बाळगता येतात.
पिल्लांचे व्यवस्थापन
इमूची पिल्ले सुमारे 370 ते 450 ग्राम वजनाची असतात (अंड्याच्या सुमारे 67% वजनाची, अर्थात हे वजन अंड्याच्या आकारावर अवलंबून असते. पहिले 48 ते 72 तास, इमूच्या पिल्लांना पिवळ्या बलकाचे (योक) वेगाने शोषण व्हावे व ती कोरडी राहावी ह्यासाठी इन्क्युबेटरमध्ये म्हणजे गरम पेटीत ठेवतात. पिल्लांचा जन्म व्हायच्या आधीच शेड स्वच्छ आणि जंतुसंसर्गरहित करून ठेवा. तांदुळाचा भुसा पसरून तो रिकामी पोती इत्यादीने झाका ज्यायोगे पिल्लांना त्रास होणार नाही. पहिले 3 आठवडे सुमारे 25 ते 40 पिल्लांसाठी दर पिल्लास 4 चौरस फूट जागा मिळेल या हिशेबाने ब्रूडरचा वापर करा. पहिल्या 10 दिवसांत 90 डिग्री फॅ. ब्रूडिंग तपमान पुरवा आणि 3-4 आठवडे 85 डिग्री फॅ. राहू द्या. योग्य तापमानावर ब्रूडिंग (वीण) यशस्वी होते. एक लीटर क्षमता असलेले पाण्याचे मग पुरवा आणि ब्रूडरखाली तितकेच फीडर ट्रफ (हौद) द्या. चिक गार्ड म्हणजे जाळीची उंची 2.5 फूट असली पाहिजे ज्यायोगे पिले तीवरून उडी मारून इकडे-तिकडे जाऊ नयेत. ब्रूडर शेडमध्ये प्रत्येक 100 चौ.फू. क्षेत्रात 40 वॉटचा एक बल्ब लावा. 3 आठवड्यांनंतर, हळू-हळू चिक गार्डचे क्षेत्र वाढवा आणि पिल्ले 6 आठवड्यांची झाल्यावर नंतर ते काढून टाका. पहिल्या 14 आठवड्यांत किंवा त्यांचे वजन 10 किलोग्राम होईपर्यंत त्यांना स्टार्टर मॅश खायला द्या. पक्ष्यांना हालचाल करण्यासाठी योग्य तितकी जागा आहे की नाही ह्याची खात्री करून घ्या कारण त्यांच्या आरोग्यमय जीवनासाठी हे गरजेचे आहे. 30 फुटांची रन स्पेस म्हणजे मोकळी जागा पाहिजे, म्हणून सुमारे 40 पिल्लांसाठी 40 x 30 फुटांची जागा हवी, जर बाहेर जागा असेल तर. फरशी सहज कोरडी होणारी व ओलसरपणा नसलेली हवी.
हे करा
कधीही खुराड्यात गर्दी होऊ देऊ नका.
पहिल्या काही दिवसांसाठी स्वच्छ केलेले पाणी व एँटी-स्ट्रेस औषधे द्या.
दररोज स्वच्छ पाणी ठेवा.
पक्ष्यांचा आराम, अन्नपाण्याचे सेवन, विष्ठेची स्थिती ह्यांचे रोज निरीक्षण करा. गरजेनुसार लगेच सुधारणा करा.
पिल्लांच्या आरोग्यमय वाढीसाठी त्यांच्या आहारांत योग्य ती खनिजे व जीवनसत्वे असल्याचे सुनिश्चित करा आणि पाय फेंगडे होण्यापासून त्यांचा बचाव करा.
उत्कृष्ट संवर्धनासाठी ऑल-इन-ऑल-आउट पध्दतींचा वापर करा.
हे करू नका
दिवसातील ऐन गरमीच्या वेळेत पक्ष्यांना हाताळू नका.
पक्षी सहज उत्तेजित होतात. म्हणून, खुराड्यामध्ये शांत आणि सौम्य वातावरणाची आवश्यकता असते.
पक्षी चटकन कोणत्याही वस्तूवर झडप घालतात, म्हणून खिळे, लहान खडे इत्यादिंसारख्या वस्तू पक्ष्यांच्या झडपेच्या सीमेत ठेवू नयेत.
फार्ममध्ये अपरिचित व्यक्ती, सामग्री आणू नका. योग्य ती जैविक सुरक्षितता पाळणे आवश्यक आहे.
पक्ष्यांना कधीही भुशाच्या बिछान्यावर थेट ठेवू नये कारण लहान पिले धावपळ करीत राहतात आणि ह्यामुळे त्यांचा पाय घसरून पडण्याची, पाय मोडण्याची शक्यता आहे.
उत्पादन व्यवस्थापन
इमू पिल्लांची वाढ झाल्यावर, त्यांना मोठ्या आकाराच्या फीडर आणि पाण्याच्या हौदाची आणि तसेच मोठ्या जागेची गरज पडते. नर-मादी ओळखून त्यांना वेगवेगळे पाळा. आवश्यकता भासल्यास, खुराड्यामध्ये कोरडे वातावरण ठेवण्यासाठी व केरकचरा आणि विष्ठेची व्यावस्था लावण्यासाठी खुराड्यामध्ये पुरेसा भुसा पसरा. पक्ष्यांना त्यांचे वजन 25 किलाग्राम होईपर्यंत किंवा ते 34 आठवड्यांचे होईपर्यंत ग्रोअर मॅश द्या. पक्ष्यांना तंतुयुक्त आहाराची सवय लावण्यासाठी त्यांना आहाराच्या 10 टक्के वेगवेगळा हिरवा पाला द्या. सदैव स्वच्छ पाणी द्या आणि त्यांना पाहिजे तेवढा आहार द्या. पूर्ण वाढ काळात त्यांचे वातावरण कोरडे ठेवण्याची खात्री बाळगा. 40 पक्ष्यांसाठी जर बाहेर देखील जागा असेल तर 40 x 100 फूट जागा पुरवा. खुराड्यामधील जमीन कोरडी राहावी ह्यासाठी पाण्याचा निचरा उत्तम होईल व कोरडी राहील याची काळजी घ्या. लहान पिल्लांना त्यांचे शरीर चांगल्या प्रकारे उभारून धरता यावे ह्यासाठी कडेला ठेवा. थोड्या मोठ्या व प्रौढ पक्ष्यांना दोन्ही पंख एका बाजूला धरून व हळूच ओढून एखाद्या इसमाच्या पायांजवळ कडेला ठेवा. पक्ष्यास कधीही लाथ मारण्याची संधी देऊ नका. तथापि, नीट घरून ठेवणे आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ज्यायोगे पक्षी व इसम कोणालाच इजा होणार नाही.
हे करा
आहार व पाणी देणे तसेच पक्ष्यांची सतर्कता जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा पक्ष्यांच्या कळपाचे निरीक्षण करा.
पक्ष्यांच्या पायांचा फेगडेपणा व विष्ठेचे निरीक्षण करा. आजारी पक्ष्यांना ओळखून त्यांना वेगळ्या जागी हलवा.
ऑल इन-ऑल आउट पध्दतीचे पालन करा. कधीही प्रौढ पक्ष्यांच्या जवळपास वावरू नका.
हे करू नका
पक्ष्यांच्या जवळपास कधीही टोकदार वस्तू, लहान खडे ठेवू नका. पक्षी मोठे खट्याळ असतात आणि समोर येईल त्या प्रत्येक वस्तूवर झडप घालतात.
कधीही पक्ष्यांना गरमीच्या दिवसांत डांबून ठेवण्यासाठी किंवा लसीकरणासाठी हाताळू नका.
दिवसभर पक्ष्यांना थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी द्या.
ब्रीडर व्यवस्थापन
इमू पक्ष्यांना 18 ते 24 महिन्यांत लैंगिकदृष्ट्या जाणते होतात. नर आणि मादी ह्यांचे प्रमाण 1:1 ठेवा. खुराड्यामध्ये वीण वाढवण्याच्या बाबतीत, जोड्या अनुरूपतेवर आधारित असायला हव्यात. मेटिंग (प्रजननासाठी वीण) दरम्यान प्रत्येक जोडीला 2500 चौ.फूट जागा पुरवा. विणीसाठी एकांत मिळावा म्हणून झाडे-झुडपे पुरवू शकता. विणीच्या कार्यक्रमाच्या 3 ते 4 आठवडे आधीच ब्रीडर आहार द्या. ह्यामधून पक्ष्यांच्या चांगल्या प्रजननासाठी आणि उबविण्यासाठी खनिजे व जीवनसत्वे ह्यांचा भरपूर पुरवठा होईल. सामान्यत: प्रौढ पक्षी 1 किलो/दिवस असा आहार घेतो. पण ब्रीडिंग हंगामात, आहार घेणे अत्यंत कमी होते. म्हणून आहारात पोषक तत्वांचा समावेश असल्याची खात्री करून घ्या.
सुमारे अडीच वर्षे वय असतांना पहिले अंडे घातले जाते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान अंडी घातली जातील, विशेषत: वर्षाच्या थंड दिवसांमध्ये. अंडी घालण्याची वेळ सुमारे 5.30 ते 7.00 संध्याकाळची असते. खुराड्यामध्ये दिवसांतून दोनदा अंडी गोळा केली जाऊ शकतात म्हणजे त्यांचे नुकसान होणार नाही. सामान्यपणे, पहिल्या वर्षचक्राच्या दरम्यान मादी 15 अंडी घालते, त्यानंतरच्या वर्षांमध्ये, अंड्यांचे उत्पादन सुमारे 30-40 अंड्यांपर्यंत वाढत जाते. सरासरी प्रमाणात, दर वर्षी एक मादी 25 अंडी घालते. एका वर्षांत 560 ग्राम वजन असलेल्या अंड्यांसह सुमारे 475-650 ग्राम वजनाची अंडी असतात. अंड्यांचा रंग हिरवट असतो आणि हिरवट रंगाच्या टणक काचेच्या गोट्यांसारखी ती दिसतात. रंगाचा गडदपणा प्रकाशानुसार बदलतो, मध्यम ते गडद हिरवा. पृष्ठभाग खडबडीत असतो तो नितळ होतो. बहुतेक अंडी (42%) मध्यम हिरवट तसेच खडबडीत पृष्ठभाग असलेली असतात.
इमूची अंडी
ब्रीडर आहार पुरेशा कॅल्शियमसह (2.7%) द्या ज्यायोगे सशक्त अंडी प्राप्त केली जाऊ शकतात. अंडी घालण्याआधी ब्रीडर पक्ष्यास अतिरिक्त कॅल्शियम दिल्याने अंड्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि नर प्रजननसक्षम राहात नाहीत. अतिरिक्त कॅल्शियमसाठी ग्रिट किंवा कॅलसाइट भुकटीच्या स्वरूपात, एका वेगळ्या हौदात ठेवून ते पक्ष्यांना द्या. खुराड्यामधून वारंवार अंडी गोळा करीत राहा. जर अंडी मातीने खराब झाली, तर ती सँण्डपेपरने घासा व कापसाने पुसा. अंड्यांची साठवण 60 डि.फॅ. तपमानाच्या थंड जागेवर करा. जास्त चांगल्या प्रकारे उबविली जावीत म्हणून कधी ही अंडी 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवू नयेत. खोलीच्या तपमानावर ठेवलेली अंडी चांगल्या प्रकारे उबविण्यासाठी प्रत्येक 3 ते 4 दिवस सेट ठेवली जाऊ शकतात.
अंडी उबविणे व पिले बाहेर येणे
प्रजननक्षम अंडी खोलीच्या तपमानाशी जुळल्यानंतर मांडा. एका ट्रेमध्ये ह्यांना थोडेसे तिरप्या किंवा आडव्या ओळींमध्ये लावून ठेवा. अंडी उबविण्याचे यंत्र (इनक्यूबेटर) नेहमी स्वच्छ व निर्जंतुक करून ठेवा. अचूक इनक्यूबेटिंग तपमान कायम राखण्यासाठी उदा. ड्राय बल्ब तपमान सुमारे 96-97 डि.फे. आणि वेट बल्ब तपमान सुमारे 78-80 डि फे. (सुमारे 30-40 टक्के तुलनात्मक आर्द्रता उर्फ आरएच). एका सेटरमध्ये अंड्यांचा ट्रे काळजीपूर्वक ठेवा, एकदा इनक्यूबेटर सेट तपमानासह संबंधित आर्द्रतेवर तयार झाले की सेट केल्याची तारीख आणि पेडिग्रीसाठी ओळख स्लिप लिहून ठेवा, आवश्यक वाटल्यास. इनक्यूबेटरच्या जागेच्या प्रत्येक 100 घनफुटासाठी 40 एमएल फॉर्मेलिन * 20 ग्राम पोटॅशियमसह इनक्यूबेटरला धुरी द्या. इनक्यूबेशनच्या 48 दिवसांपर्यंत प्रत्येक तासाला अंडी फिरवा. 49व्या दिवसापासून, अंडी फिरविणे थांबवा आणि ध्वनि संकेताची वाट पहा. 52व्या दिवशी, इनक्यूबेशनचा काळ संपतो. पिलांना कोरडेपणाची गरज असते. पिलांना कमीत कमी 24 ते 72 तास हॅचर कंपार्टमेंटमध्ये ठेवा, ज्यायोगे लव कमी होवून पिले निरोगी होतील. सामान्यपणे, हॅचिंग (अंड्यातून पिले बाहेर येणे) क्षमता 70 टक्के किंवा जास्त असेल. कमी क्षमतेची अनेक कारणे असू शकतात. योग्य तो ब्रीडर आहार आरोग्यमय पिलांची खात्री देतो.
अन्न देणे
योग्य वाढ आणि प्रजोत्पादनासाठी इम्युंना समतोल आहाराची गरज असते. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे काही पोषणविषयक गरजांचा सल्ला देण्यात आला आहे (तक्ता 1 आणि 3). पोल्ट्रीच्या काही सामान्य घटकांचा वापर करून आहार तयार करता येतो (तक्ता 2). उत्पादन मूल्याचा 60-70 टक्के भाग आहारासाठी खर्च होतो, म्हणून कमी किंमतीच्या आहाराचा वापर करून नफ्याचे मार्जिन वाढविता येते. व्यावसायिक फार्म्समध्ये, दर ब्रीडर इम्यु जोडीचा वार्षिक आहार खर्च 394-632 किलोग्राम ते साधारण 527 किलोग्राम सरासरी पडतो. ब्रीडिंग व ब्रीडिंग नसलेल्या हंगामात अनुक्रमे आहाराची किंमत रू.6.50 आणि 7.50 होती.