कृषी सेवक I ११ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु वाढीव उत्पादनासाठी शेतकऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर होत आहे. रासायनिक कीटकनाशके व रासायनिक खते यांच्या वाढलेल्या किमती, कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, जमिनीचा खराब होत जाणारा पोत यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी तुलनेने कमी खर्चिक अशा प्रदूषणमुक्त व रसायनमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. यालाच प्रोत्साहन म्हणून राज्यात सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेला कृषी विभागामार्फत महाराष्ट् राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांचे हस्ते कृषिभूषण (सेंद्रिय शेती) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी प्रमाणे सन 2021 साठी कृषी विभागामार्फत नाशिक विभागातील शेतकरी अथवा संस्थान कडून कृषीभूषण (सेंद्रिय शेती) या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पुरस्काराचे स्वरूप- रू.50,000/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार
देण्यात येणारे पुरस्कार संख्या – 08 (प्रत्येक कृषी विभागातून 01 याप्रमाणे)
पुरस्कारासाठी चे निकष
1) सेंद्रिय शेतीचे पीजीएस किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणीकरण केलेले असावे 2) संबंधित शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतलेले असावे त्याच प्रमाणे सेंद्रिय शेती पद्धतीचा किमान पाच वर्षे अवलंब केलेला असावा.
3) प्रस्तावित शेतकरी स्वतः सेंद्रिय शेती गट, कार्यशाळा, प्रदर्शने याद्वारे सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसिद्धी करणारा व सेंदिय शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नेतृत्व करणारा असावा.
4) प्रस्तावित शेतकरी गांडूळ खत, बायोडायनिक कंपोस्ट, दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर यासारख्या सेंद्रिय निविष्ठा स्वतःच्या शेतावर तयार करून त्याचा वापर करणारा असावा.
5) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान तीन वर्ष असावे
6) प्रस्तावित शेतकरी केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा.
संस्थेसाठी चे निकष
1) संस्था नोंदणीकृत असावी
2) संस्थेकडे असलेले तांत्रिक मनुष्यबळ व त्यांची शैक्षणिक पात्रता अनुभव अवगत केलेले तंत्रज्ञान व घेतलेली प्रशिक्षणे याबाबत माहिती सादर करावी.
3)संस्थेने सेंद्रिय शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये भरीव कामगिरी केलेली असावी.
4) संस्थेचे कार्यक्षेत्र दर्शवणारी व संस्थेशी संलग्न इतर संस्थांची माहिती असावी.
5) संस्थेचे सभासद संख्या संस्थेचा उद्देश, घटना व नियमावली इत्यादी बाबत माहिती असावा प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे
1) 7/12 व 8- अ चा उतारा
2) केंद्र राज्य शासकीय निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसले बाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
3) मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला
4)मिळालेले पुरस्कार व कृषी विषयक कार्य दर्शविणारे प्रमाणपत्रे
5)सेंद्रीयपीकस्पर्धा, कृषीप्रदर्शने, कार्यशाळा, चर्चासत्रइ. उपक्रमात सहभागी झाल्याबाबद तपशील
तरी वरील प्रमाणे नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकरीव संस्थायांनी अधिक
माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून
पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक श्री. मोहन वाघ, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.