सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळणार पिक विमा !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २ ऑक्टोबर २०२३

राज्यातील सव्वाकोटी शेतकऱ्यांना पीकविम्याची पहिल्या टप्प्यात २५ टक्के रक्कम मिळणार आहे. राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे ४०६ कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरीत केले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी ४० लाख ९७ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. मात्र, पेरणीनंतर काही दिवसांनी पावसाचा मोठा खंड पडला आणि राज्यातील जवळपास आठशेहून अधिक महसूल मंडळांमधील पिकांना त्याचा फटका बसला. तर पाण्याअभावी पिकांची उत्पादकता देखील कमी झाली.

राज्यातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ४० टक्के सुद्धा पाऊस झाला नाही. त्यावेळी ४५६ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड एक महिन्याचा होता. दुसरीकडे ५८८ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवस पाऊसच नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली.

‘एक रुपयात पीकविमा’मधील शेतकरी हिश्शाची रक्कम विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती. त्यामुळे कंपन्या गप्प होत्या. आता सरकारने पैसे वितरीत केले असून तत्पूर्वी, विम्यापोटी केंद्र व राज्य सरकारचा तीन हजार कोटींचा हिस्सा देखील कंपन्यांना मिळालेला आहे. विमा कंपन्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर कृषी विभागाकडून तोडगा काढला जात आहे. एकंदरीत, लवकरच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा
#bjpgoverment#cmshinde
Comments (0)
Add Comment