बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३
देशभरातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे शेती करीत असतात, नेहमीच शेतकरी कोणत्या ना कोणत्या संकटात अडकत असतांना आता पुन्हा एकदा पपई उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. पण मागील महिन्यात झालेल्या जास्त पाऊसामुळे पपई पिकांवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात जवळपास 4000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. मात्र यावर्षी शहादा तालुक्यात पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे कारण पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या झाडावरील पाने गळतात आणि पाने आकसतात. यामुळे फळे खराब होतात अशा फळांना व्यापारी खरेदी करत नसल्याने हाताशी आलेल पिक सोडुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात जवळपास 3000 हेक्टर पेक्षा अधिक पपईवर या मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत तरी देखिल पपई पिकावरील संकट दूर होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.