कृषीसेवक | १० नोव्हेबर २०२३
देशभरात दिवाळीचा उत्साह सुरु आहे. या उत्साहामध्ये बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी मागणी देखील असते. यामुळे शेतकरी झेंडूची लागवड करुन चार पैसे मिळण्याची अपेक्षा ठेवत असतात. परंतु यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांना भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावरच फेकून दिले. कृत्रिम फुले स्वस्त दरात मिळू लागल्याने नैसर्गिक फुलांना कमी मागणी अशी नेहमी चर्चा हाेत असते. त्यातूनच आता कृत्रिम फुलांवर बंदी आणा अशी मागणी शेतक-यांत हाेऊ लागली आहे.
दसरा आणि दिवाळीत झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. या दोन्ही सणांना घराघरात झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. पुजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी झेंडूची लागवड करतात. त्यामाध्यमातून सणासाठी शेतकऱ्यांच्या घरात चार पैसे येतात. परंतु यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांना भाव न मिळाल्याने शेतकरी वर्ग संकटात आला होता.
आता दिवाळीच्या सणाला सुद्धा बाजारामध्ये फुलांना भाव कमी प्रमाणात असून जवळपास 30 ते 40 रुपये किलो बाजारभाव असून आवक कमी असल्यामुळे या दिवाळीला तरी झेंडूला आणि इतर फुलांना भाव मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी केली आहे. सध्या बाजारांमध्ये कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे झेंडू आणि इतर फुलांची मागणी कमी झाली आहे. वर्षभर टिकणारे प्लास्टिकचे आणि कापडाचे कृत्रिम फुले वापरण्यावर नागरिक जास्त भर देत आहेत. त्यामुळे शेतीमध्ये पिकलेल्या फुलांना भाव कमी मिळत असून प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दसऱ्याला फुलांना भाव मिळाला नाही मात्र आता दिवाळीत तरी भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.