रस्त्याअभावी सोयाबीन शेतात पडून ; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीनचे पीक दीड महिन्यापासून रस्त्याअभावी घरी आणणे जमत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने अखेरीस या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना शेतात ‘रोडगे पार्टीला या’ असे आमंत्रण दिले. याबाबत निमंत्रण पत्रिका बनवून समाज माध्यमांवर प्रसारितही केली आहे.

किमान यामुळे तरी आता न्याय भेटेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बुद्रूक येथील शेतकरी विनोद मानकर यांनी शेतात गत दीड- दोन महिन्यांपासून सोयाबीन सोंगणी करून त्याचा ढीग लावलेला आहे. शेतात जाण्यासाठी असलेल्या शासकीय रस्त्यावर बाजूच्या शेतकऱ्याने अतिक्रमण करून तो रस्ता अडविल्याचा आरोप आहे. यामुळे मानकर यांना सोयाबीनचे पीक घरी आणता येत नाही. दोन महिन्यांपासून सोयाबीन पिकाच्या गंजीवरच ते दिवसरात्र मुक्कामी आहेत.

रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत त्यांनी तक्रार केली आहे. ७ एप्रिल २०२१ रोजी तहसीलदारांकडे रीतसर अर्ज केला होता. त्यानुसार तहसिलदारांनी २३ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश पारीत करून रस्ता देण्याचे स्पष्ट केले. याविरुद्ध संबंधित शेतकऱ्याने दिवाणी न्यायालयातून तहसीलदारांच्या आदेशावर मनाई हुकमाचा दावा दाखल केला. हा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. परिणामी रस्त्याचा तोडगा निघालेला नाही. याचा फटका मानकर यांना बसत आहे. त्यांचे यंदाच्या खरिपातील सोयाबीनचे पीक शेतातच पडून आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment