‘या’ म्हशीच्या दुधाला आहे मोठी मागणी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २७ सप्टेंबर २०२३

देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पशुपालनाचा व्यवसाय करून यशस्वी होत आहे. शेतीला जोडधंदा असणारा प्रमुख व्यवसाय म्हणून पशुपालनाकडं बघितलं जातं. पशुपालनाच्या माध्यमातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. मोठ्या प्रमाणात दूध देणाऱ्या गाई-म्हशींच्या नवनवीन जाती आहेत. या जातींचं शेतकरी संगोपन करुन चांगलं उत्पन्न मिळवतायेत. गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे आणि दरही जास्त आहे.

मुर्रा जास्त दूध देणारी म्हैस
गाई आणि दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त किंमत आहे. याचे कारण म्हणजे म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा सकस असते. आज आपण जास्त दूध देणाऱ्या म्हशीच्या जातीची माहिती पाहणार आहोत. म्हशीची मुर्रा जात ही जास्त दूध देणारी जात मानली जाते. देशातील मोठ्या संख्येनं पशुपालक मुर्रा म्हशी पाळतात. या म्हशीच्या दुधातून पशुपालकांना चांगला नफा होतो. मुर्रा म्हशीची दूध देण्याची क्षमताही इतर जातींपेक्षा जास्त आहे. मुर्रा म्हशीचा रंग हा काळा असतो. याशिवाय त्याची शिंगे वक्र असतात. हरियाणा, दिल्ली, आणि पंजाबमधील रोहतक, हिसार, जिन्द आणि करनाल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुर्रा म्हशी आढळतात. तसेच परदेशातही इटली, बल्गेरिया, इजिप्त इत्यादी देशात या म्हशी आढळतात. हरियाणामध्ये मर्रा म्हशीला काला सोना असेही म्हणतात. दुधामध्ये चरबी उत्पादनासाठी मुर्रा ही उत्तम जात आहे. त्याच्या दुधात 7 टक्के चरबी आढळते.

मर्रा म्हशीची किंमत किती?
पशुपालकांना मुर्रा म्हशीच्या दुधाला चांगला भाव मिळतो. या म्हशीची किंमत 50 हजार रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे. मुर्राह म्हशीची जात तिच्या चकचकीत काळ्या सौंदर्यासाठी आणि चरबीयुक्त उच्च दूध उत्पादनाच्या फायद्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. जर मुर्राह म्हशींना चांगले चारा दिला आणि त्यांची काळजी घेतली तर त्या म्हशी 20 लिटरपेक्षाही अधिक दूध देऊ शकतात.

मुर्रा म्हैस दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देते
मुर्राह म्हशीचे डोके लहान आणि लांब शेपूट असते. तसेच त्याचा मागील भाग मोठा असतो. या म्हशीच्या डोक्यावर, शेपटीवर आणि पायावरही सोनेरी रंगाचे केस आढळतात. मुर्रा म्हशीचा गर्भधारणा कालावधी हा सुमारे 310 दिवसांचा असतो. त्याची नीट काळजी घेतल्यास ही म्हैस दररोज 20 ते 30 लिटर दूध देते.

 

बातमी शेअर करा
#buffalo
Comments (0)
Add Comment