हिरव्या सोबत लाल रंगाची भेंडी खात आहे भाव !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १४ जानेवारी २०२३ । आजवर तुम्ही हिरवी भेंडी बघितली असेल पण लाल भेंडीचे सुद्धा शेती होत आहे. शेतकरी आपल्या शेतात सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करत असतात. यामधून ते चांगले उत्पन्नही मिळवतात. शेतकरी आता वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांची शेती देखील करत आहेत. हिरव्या रंगात मिळणाऱ्या भाज्या आता वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होत आहेत. या भाज्यांना बाजारात मोठी मागणी देखील आहे. हिरव्या रंगाच्या शिमला मिरचीसोबतच आता लाल आणि पिवळ्या रंगाची शिमला मिरची देखील बाजारात आली आहे. त्याचबरोबर आजपर्यंत आपण हिरवी भेंडी बघितली असेल, पण आता लाल भेंडी देखील बाजारात दाखल झाली आहे. ‘काशी लालिमा’ या जातीची ही भेंडी आहे.
साधारणपणे भारतातील बहुतांश भागात हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. परंतु आता ग्राहकांची मागणी बदलत आहे. हिरव्या रंगात मिळणाऱ्या भाज्या आता वेगवेगळ्या रंगात उपलब्ध केल्या जात आहेत. त्याही पूर्णपणे नैसर्गिक आहे. फक्त रंगामध्ये फरक आहे. आता बाजारात लाल भेंडी देखील दाखल झाली आहे. जरी हिरव्या रंगाच्या भेंडीचे फायदे असले तरी लाल रंगाची काशी लालिमा भेंडीत देखील लोह, जस्त, कॅल्शियम आणि मोठ्या प्रमाणात प्रथिने आहेत.

कुठे मिळेल लाल भेंडीचे बियाणे
वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चने हे लाल रंगाची भेंडी विकसित केली आहे. ही भेंडी आता उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये लागवड केली जात आहे. याठिकाणी मागणी असल्याचेही दिसत आहे. सुरुवातीला लाल रंगाच्या काशी ललिमा भेंडीच्या बियाणे उपलब्ध होण्याची मोठी समस्या होती. परंतू आता नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनने काशी लालीमा बियाणे shop.mystore.in वर उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवरून बियाणे मागवून शेतकरी लाला भेंडीची लागवड करु शकतात. येत्या हंगामात म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान लाल भेंडीचे पीक घेऊ शकतात.

भेंडीचा रंग लाल कसा झाला?
लाल भेंडी ‘काशी लालिमा’मध्ये अँथोसायनिन आढळते. तर हिरव्या भेंडीमध्ये क्लोरोफिल असते. अँथोसायनिन हा लाल भेंडीचा घटक आहे. यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करते. काशी लालिमामध्ये फॉलिक अॅसिड आढळते. जे गर्भाशयात वाढणाऱ्या मुलाच्या मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या भेंडीचे नियमित सेवन केल्याने कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

लाल भेंडीत वेगळेपण काय?
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, लाल भेंडीला बाजारात जास्त किंमत मिळाली आहे. लाल भेंडी ही हिरव्या भेंडीप्रमाणेच घेतली जाते. हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाला भेंडीचे प्रति हेक्टरी उत्पादन थोडे कमी आहे. लाल भेंडीमध्ये लोह, झिंक, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. काशी लालिमाची पेरणी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत केली जाते. 3.5 ते 4 किलो बियाणे प्रति एकरसाठी वापरले जातात. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत देखील 5 ते 6 किलो प्रति एकर याप्रमाणे लाल भेंडीची लागवड करता येते. काशी लालिमाच्या बिया पेरल्यानंतर 45 दिवसात पहिली तोडणी केली जाते. या जातीच्या प्रत्येक रोपातून 20 ते 22 भेंडीचे उत्पादन मिळते. लाल भेंडीचे सरासरी उत्पादन 150 ते 180 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम