कृषी सेवक । १३ फेब्रुवारी २०२३। देशातील अनेक भागातील शेतकरीनी मोठ्या प्रमाणात कापूसची लागवड केली असतांना कापूस बाजारभाव ८ हजारच्याही खाली गेले आहेत. घसरलेल्या कपाशीच्या दरामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मागील वर्षी कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यंदा कापसाचे दर ८ हजार रुपयांहून खाली घसरलेले असल्याने शेतकरी द्विधा अवस्थेत सापडला आहे. कापूस बाजारभाव पुन्हा ११ हजारांवर जातील काय? पुढील २ महिने कापूस बाजारात काय परिस्थिती राहील? आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सध्या काय स्थिती आहे याबाबत आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.
अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजात कपात होईल असा अंदाज वर्तवला आहे. चीन, बांगलादेश, पाकिस्तान, टर्की या महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमधील कापूस आयात कमी राहील, असंही युएसडीने म्हटलंय. परंतु असे असले तरी यंदा कापूस दर टिकून राहतील असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कापूस बाजाराविषयी युएसडीएनं आणखी काय म्हटलंय? जगातील कापूस उत्पादन आणि वापर किती कमी झाला? आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा काय अंदाज आहे? या सर्व घडामोडींचा भारतातील कापूस बाजारावर काय परिणाम होईल? यासर्वबाबींबद्दल आपण खाली चर्चा करणार आहोत.
अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजात १८ लाख गाठींची कपात केली आहे. जागतिक कापूस उत्पादन १४६३ लाख गाठींवर स्थिरावेल असा अंदाज युएसडीने व्यक्त केला आहे. १४८१ लाख गाठी इतके मागील हंगामात उत्पादन झाले होते. यंदा कापूस शिल्लक राहील असं USD ने म्हटले आहे.
मागील हंगामात जागतिक पातळीवर १५०१ लाख गाठी इतका कापूस वापरला गेला होता. मात्र यंदा १४१५ लाख गाठी इतकाच कापूस वापरला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच एकूण ८६ लाख गाठी कापूस कमी वापरला जाईल असा युएसडीचा अंदाज आहे. यामुळे चीनची आयात १.२८ लाख गाठी, बांगलादेशची कापूस आयात ३ लाख गाठी तर टर्कीची आयात ७ लाख गाठींनी कमी होईल असे युएसडीने म्हटले आहे.
भारतातील कापसासाठी बांगलादेशातील कापसाची आयात महत्वाची आहे. कारण बांगलादेश हा भारताचा प्रमुख ग्राहक आहे. मागील हंगामात बांगलादेशने १०४ लाख गाठी कापूस आयात केला होता. यंदा बांगलादेश १०१ लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता आहे. यंदा पाकिस्तानातील कापूस उत्पादनात अतिशय मोठी घट झाली आहे. पाकिस्तानातील कापूस उत्पादन २६ लाख गाठींनी कमी होऊन ५० लाख गाठींवर स्थिरावले आहे. यामुळे पाकिस्तानातील कापड उद्योगांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
युएसडी ने यंदाच्या हंगामात सरासरी ८४ सेंट प्रति पाऊंड असा दर मिळेल असा अंदाज जाहीर केला आहे. सध्या देशातील सूत गिरण्या ९० टक्के क्षमतेने सुरु झाल्या आहेत. तसेच कॉटन उद्योगांना चांगला नफा मिळत असल्याचंही बोललं जात आहे. तसेच भारतातून कापसाची निर्यातही सुरु झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव टिकून आहेत. त्यामुळे देशातील कापूस बाजारभाव सुधारतील असे मत कापूस अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. मात्र कापसाच्या दरात खूप मोठी उलाढाल होणार नाही असंही बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर कापूस ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० या रकमेच्या दरम्यानच राहील अशी शक्यता आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम