करवंद लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | उन्हाळा सुरू झाला की सर्वांना प्रतिक्षा असते ती फळांचा राजा आंबा कधी एकदा पिकतो आणि ते खाण्याची. यासोबतच माळरानावर किंवा डोंगरावरील रामनेवासुद्धा येतो. रानमेवा म्हणजे करवंद खाण्यात एक वेगळाच आनंद असतो.

हे मध्यम आकाराचे काटेरी झाड असते. पण चांगलाच फल्लर (झुडूपासारखे) वाढते. करवंदा झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. तसेच काटेरी झाड असल्याने कुंपण करण्याच्या कामी येते. शिवाय कमी कष्टात फळांचे उत्पन्न बऱ्यापैकी मिळते.

करवंद लागवडीचे तंत्र

बांधावर ३ ते ५ फूट अंतरावर लागवड करावी. शेतात लागवड करायची असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ८ फुटांवर लागवड करावी. लागवडीसाठी १ फूट बाय १ फुटाचा खड्डा घ्यावा. त्यामध्ये माती व सेंद्रिय खत १:१ या प्रमाणात खड्डा भरून घ्यावा.
या पिकास विशेष खताची आवश्यकता नाही, परंतु फळ उत्पादनामध्ये सातत्य राहावे, यासाठी प्रति झाडास ५ किलो शेणखत दरवर्षी आळ्यात मिसळून द्यावे.
लागवडीपासून तिसऱ्या वर्षापासून फळे लागायला सुरुवात होतात. सर्वसाधारणतः कोकणात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फळे एप्रिल-मे मध्ये मिळतात.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वळीवाचा पाऊस पडल्यानंतर म्हणजेच मे च्या शेवटी फुलधारणा व फलधारणा चालू होते. ही फळे जुलै, ऑगस्टमध्ये तयार होतात.
फळे सुरुवातीला हिरवे, नंतर पिवळे व गर्द लाल होऊन काळी पडतात. अशी काळी फळे खाण्यासाठी योग्य असतात.
हिरवी व लालसर फळे प्रक्रिया उद्योगामध्ये वापरतात.
कलमाच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी चौथ्या वर्षापासून प्रत्येक कलमास ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात 25 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत घालावे.
फुले व फळधारणा लवकर होण्यासाठी खताच्या रिंगामध्ये 10 ते 15 लिटर गोमूत्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दोन ते तीन वेळा ओतावे. कलमांच्या सभोवती तणांची वाढ होऊ नये म्हणून 15 सेंमी जाडीचे पालापाचोळ्याचे आच्छादन द्यावे.
पाचव्या वर्षापासून दर वर्षी फळे काढणीनंतर मे-जून महिन्यात फांद्यांची छाटणी करावी.

जमिन
करवंदाचे झाड काटक असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. डोंगर कपारीच्या अत्यंत हलक्या मुरमाड जमिनीत करवंदे चांगली वाढतात.
हवामान
कोरड्या हवामानापासून उष्ण व दमट हवामानात सुद्धा करवंदे चांगली येतात. जास्त थंड प्रदेशात ह्या झाडाची वाढ होत नाही म्हणून महाराष्ट्रातील डोंगर उतारावर करवंदाची लागवड सहज करता येते.

करवंदाच्या जाती
करवंदाच्या जाती फळांच्या रंगावरून आणि आतील गरावरून ठरविल्या जातात. उदा. हिरवे, गुलाबी पांढरे, काळे व तपकिरी करवंदे असे म्हटले (ओळखले) जाते.
१) हिरवी करवंदे : लांबट गोल असून त्यावर तपकिरी छटा असते. फळ आंबट, बी टणक व गर रसदार असून ही जात मुरंब्यास चांगली असते.
२) गुलाबी जात : छोटी ते मध्यम आकाराची, फळावर फिक्कट ते गडद गुलाबी रंग, कमी आंबट व जास्त टणक बियांची असते.
३) काळी जात : हिरव्या रंगाची असून, त्यावर गडद काळी तपकिरी छटा असते. ही जात जंगल प्रदेशात डोंगरावर येते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम