असे करा घरी बीज परीक्षण

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | रब्बी हंगामामध्ये सुमारे ६५% बियाणे ही विक्रेत्याकडून खरेदी केली जात असली, तरी उर्वरित ३५% बियाणे स्वतःच्या घरचे वापरतात. हे बियाणे सुधारित जातीचे असले तरी त्यांची आनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता तपासली पाहिजे.

घरचे किंवा खरेदी केलेले बियाणे बीज परीक्षण प्रयोगशाळेतून तपासून घ्यावे. बियाणे तपासणीसाठी राज्यात पुणे, नागपूर व परभणी येथे शासकीय बीजपरिक्षण प्रयोगशाळा आहेत. तपासणीसाठी प्रति बियाणे नमुना रु. ४० शुल्क आकारले जाते. अनेक वेळा शेतकऱ्यांना बियाण्यांचा नमुना काढणे, प्रयोगशाळेत पाठवणे किंवा नेणे शक्य होत नाही. त्यामुळे घरच्या घरी उगवणक्षमता कशा प्रकारे तपासता येईल, याची माहिती घेऊ.

कृती : ४५ × ४५ सें.मी. आकाराचे दोन स्वच्छ गोणपाट घेऊन त्याला पांढऱ्या सुती कापडाचे अस्तर लावावे. ते पाण्यात भिजवून त्यामधील जादा पाणी निथळू द्यावे. एका गोणपाटाच्या पांढऱ्या कापडावर शंभर बिया एकमेकांपासून सारख्या अंतरावर ठेवाव्यात.

त्यावर दुसरे गोणपाट ओले करून अस्तरासहित झाकावे. त्यानंतर ते दोन्ही गोणपाटांची गुंडाळी करून रोल करावा. तो रोल सावलीत, पण उजेडात उभा करून ठेवावा. साधारण ओलावा टिकून राहील, अशा पद्धतीने त्या गुंडाळीवर पाणी शिंपडावे.

मोठ्या आकाराच्या बियाण्यांची (उदा. मका, हरभरा, भुईमूग, वाटाणा, वाल इ.) उगवणक्षमता तपासण्यासाठी टपामध्ये शेतातील माती चाळणीने चाळून ५ सें.मी.इतका जाड थर द्यावा. त्यात १०० बीज एकमेकांपासून सारख्या अंतरावर लावावे. मातीने झाकून झारीने मुबलक पाणी घालावे.

वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे अंकुर मोजणीचे दिवस आहेत. ते साधारण ४ ते १४ दिवसांपर्यंत आहेत. पहिली अंकुर मोजणी ही चौथ्या दिवशी, तर दुसरी चाचणी चौदाव्या दिवशी करावी. जर यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले तर हलकेसे पाणी शिंपडावे. काही पिकांमध्ये बीज अंकुरण प्रक्रिया हळू असते. उदा. भोपळा, दोडका, कारले, गिलके आदी. त्यामुळे ते शक्यतो १२ व्या ते १४ व्या दिवशीच मोजावेत.

अशा प्रकारे निरीक्षण करतेवेळी खालील प्रकार दिसून येतात

१) सामान्य उगवलेले (चांगली उगवण झालेले),

२) असामान्य उगवलेले (मूळ किवा अंकुरची निकृष्ठ वाढ)

३) ताजेतवाने पण न उगवलेले.

४) कठीण बिया.

५) मृत बिया (बुरशी लागलेले, कुजलेले बी)

निरीक्षण करतेवेळी फक्त सामान्य उगवलेल्या अंकुरांचाच विचार करावा. त्याहून प्रति हेक्टरी किंवा प्रति एकरी बियाण्यांचे आवश्यक प्रमाण ठरवावे. प्रत्येक पिकाची उगवण क्षमतेचे कमीत कमी प्रमाण (६०% ते ९०%) ठरवून दिलेले आहे. त्यानुसार प्रति हेक्टरी किंवा प्रति एकरी बियाण्याचे प्रमाण ठरलेले आहे.

त्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास तेवढ्या प्रमाणात बियाण्याचे प्रमाण वाढवावे. यामुळे नांगे भरणे, रोपे सांदणे, काही वेळेला तर दुबार पेरणी अशा अनेक खर्चामध्ये बचत होऊ शकते. तसेच अजिबातच (१०० टक्के) बियाणे न उगवण्याच्या घटनाही टाळता येतात.भारतीय किमान बीज प्रमाणीकरण निकषानुसार प्रत्येक पिकाच्या बियाण्याची किमान उगवण क्षमता किती असावी, हे ठरविण्यात आलेली आहेत.

ज्वारी ८०, मका ९०,वाटाणा ७५,हरभरा ८५,सूर्यफूल, भुईमूग ७०,करडई ८०,पालक, मिरची, गिलके, दोडके, भोपळा, कारले, डांगर, गवार ६०,फुलकोबी, भेंडी ६५,मेथी, कांदा, टोमॅटो, गवार, कोबी, वांगी, मुळा ७०

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम