शेतकऱ्यांवर संकट तर दोन दिवसावर बैलपोळा !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १२ सप्टेंबर २०२३ 

गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यावर मोठे संकट उभे आहे तर येत्या १४ सप्टेंबरला बैलपोळा पार पडत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा सण म्हणजे बैलपोळा. यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठा रंगीबेरंगी सजावटीने फुलल्या आहेत. बाजारपेठेत देखील विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झालं आहे. शेतकरी देखील बाजारपेठेत यामुळे खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा आनंदात साजरा करतात. तसंच बाजारातून सजावट साहित्य खरेदी करुन बैलांना सजवून हा सण आनंदात साजरा करतात. बैलपोळा सणासाठी रंगीबेरंगी माळा, झालर, विविध प्रकारचे कंडे, गोंडे, चंगाळी, बैलाच्या शिंगाना देण्यासाठी विविध प्रकारचे कलर असे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालं आहे.

बैलपोळा दिवशी शेतकरी सकाळसकाळी बैलांना अंघोळ घालून स्वच्छ करतात. त्यानंतर बैलांना रंगीबेरंगी कलरने सजवून त्याच्यावर आकर्षक नक्षीकामे केले जाते. बैलांवर झुली, शिंगांना शिगुंळ, गळ्यात रंगीबेरंगी माळा घातल्या जातात. तसंच काही हौशी शेतकरी वाजत गाजत, डीजे लावून बैलांची गावभर मिरवणूक काढतात. त्यानंतर रात्री पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना दिला जातो.

शेतकरी आठवडाभर तयारी करून मोठ्या उत्साहात सण साजरा करतात. पण यंदा पावसाचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. यातच महागाई आहे, तरी देखील शेतकरी बैलांचा सण साजरा करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसंच विविध साहित्याने देखील बाजारपेठ फुलली आहे. दरम्यान, बैलपोळा सणाला शेतकरी खूप महत्व देतात. शेतात चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी व मजुरांबरोबरच बैलजोडीचेही योगदान खूप असते. पोळ्यानिमित्त शेतकरी बैलजोडीला सजवून गावभर गावदेवांना वाजत गाजत पाया पडण्यासाठी नेतात. तसंच प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी या दिवशी घरी गोड पदार्थ बनवले जातात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम