उन्हाळ्यात याची लागवड केल्यास हमखास होणार उत्पन्न !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ११ फेब्रुवारी २०२३।  भारत हा शेती प्रधान देश असून देशातील प्रत्येक राज्यात विविध पिके घेतली जातात, तर उन्हाळ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तेल बियांची एकूण नऊ पिके घेतली जातात. त्यापैकी भुईमूग हे महत्त्वाचे पीक आहे. राज्यात सन २०१८-१९ कालावधीमध्ये उन्हाळी भुईमुगाची लागवड ०.८५० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली व त्यापासून १.१७ लाख टन वाळलेल्या शेंगांचे उत्पादन मिळाले. तर सरासरी उत्पादकता १३७६ किलो प्रति हेक्टर इतकी होती. भुईमूग पीक सूर्यप्रकाशाच्या कालावधीला जरी संवेदनक्षम असले तरी भारतात भुईमूग हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेता येते. खरीपापेक्षा उन्हाळी हंगामात बागायतामुळे पुरेसा ओलावा, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान असल्याने भुईमूग पिकाची वाढ चांगली होते व अपेक्षित उत्पादन मिळते.

भुईमुगाच्या शेंगापासून खाद्यतेल व पेंड मिळते. वेलपाल्याचा उपयोग जनावरांना चारा म्हणून होतो व टरफलापासून हार्डबोर्ड तयार होतो. भुईमूग हे शेंगवर्गीय पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढते. भुईमुगामध्ये २६ टक्के प्रथिने ४८ टक्के तेल आणि ३ टक्के तंतुमय पदार्थ असतात. तसेच त्यामध्ये कॅल्शियम, थिओनिन व नायसिन चे प्रमाण चांगले असते. वरील गुणधर्मामुळे भारतासारख्या व प्रामुख्याने शाकाहारी देशात चांगल्या पोषणयुक्त आहाराच्या दृष्टीने भुईमूग हे निसर्गाने दिलेले वरदान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतात दरवर्षी खाद्यतेलाच्या एकूण गरजेच्या अंदाजे ५० टक्के गरज आयात केलेल्या तेलापासून भागवली जाते. तेलबियांच्या उत्पादनात आपला देश स्वयंपूर्ण व्हावा या दृष्टीने उन्हाळी भुईमुगाची लागवड सुधारित पद्धतीने होणे गरजेचे आहे.

भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते. अशा प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहात असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळावरील नत्राच्या गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत करून घेण्यासाठी जमिनीची मशागत चांगली होणे आवश्यक आहे. यासाठी खोल नांगरट करून घ्यावी. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात शेवटच्या कुळवणी अगोदर १० टन प्रति हेक्टरी शेणखत मिसळावे.
उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या वेळात करावी. जमिनीत चांगल्या प्रकारची ओल होताच म्हणजे जमीन ओलावून अथवा पेरणी करून ताबडतोब पाणी द्यावे. बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेंटिग्रेड पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पेरणीस जसजसा उशीर होईल तशी उत्पादनात घट येते. तसेच मे महिन्याच्या शेवटी किवा जून महिन्यात काढणी गेल्यास मान्सूनपूर्व पावसापासून धोका होण्याची शक्यता असते.
पेरणी अंतर पेरणी पद्धत भुईमुगाची लागवड ही पेरणी व टोकन पद्धतीने करता येते. भुईमुगाची पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपातील अंतर १० सेंटिमीटर ठेवावे. उगवण झाल्यावर लगेच नांग्या भराव्यात. उगवणीनंतर रोपांचे कावळे, कबूतरे इत्यादींपासून संरक्षण करावे. या पद्धतीस रुंद वरंबा व सरी पद्धत असे म्हणतात. ट्रॅक्टरच्या बेड यंत्राच्या साह्याने ९० सेंटीमीटर (०.९० मीटर) रूंदीचे वाफे तयार करून घ्यावे अथवा पूर्व मशागतीनंतर तयार झालेल्या शेतामध्ये १.२० मिटर अंतरावर छोट्या नांगराच्या साह्याने ३० सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे ०.९० मीटर रुंदीचे रुंद गादीवाफे तयार होतात. वाफ्याची उंची १५ ते २० सेंटिमीटर ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळीतील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपातील अंतर १० सेंटिमीटर ठेवून टोकण पद्धतीने भुईमुगाची लागवड करावी. बियाणे खते व इतर मशागत नेहमीच्या पद्धतीप्रमाणे करावी.

paid add

पेरणीपूर्वी ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे.फुटके कीडके, साल निघालेले, बारीक बी निवडून काढावे. पेरणीसाठी केवळ टपोरे बियाणे वापरावे. पेरणीकरिता सर्वसाधारणपणे उपट्या वाणासाठी १०० किलो तर मोठ्या दाण्यांच्या वाणासाठी १२५ किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. नीमपासऱ्या व पसऱ्या वाणासाठी ८० ते ८५ किलो हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता विचारात घेऊन त्याप्रमाणे वाढीव बियाणे वापरावे.

पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रिया नंतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व २५० ग्रॅम स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे व हे बियाणे पेरणीसाठी लगेच वापरावे. पूर्वमशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी १० टन (२० गाड्या)कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. भुईमुगाला पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद खत मात्रा द्यावी. ही खत मात्रा युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट च्या माध्यमातून द्यावयाची झाल्यास ५४ किलो युरिया अधिक ३१२.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावा. स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेट च्या माध्यमातून दिल्याने भुईमुगासाठी आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि गंधक ही अन्नद्रव्य पिकास मिळतात. त्याचबरोबर कॅल्शियम व गंधकाच्या उपलब्धतेसाठी ४०० किलो जिप्समचा वापर करावा त्यापैकी २०० किलो जिप्सम पेरणीवेळी तर उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना द्यावा.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम