गुळाच्या उत्पादनातून लाखोंची उलाढाल !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १९ जानेवारी २०२३ ।  राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात गुळाचं उत्पादन घेतलं जातं. वेगवगळे पदार्थ तयार करताना साखरेप्रमाणेच गुळाचा वापर होत आहे. गुळाच्या चहाला देखील मोठी मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील दुर्गम भागातील आष्टी या गावात देखील गुळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रासायनिक द्रव्याचा वापर न करता आष्टीमध्ये गुळाचं उत्पादन घेतलं जातं. या आष्टीच्या गुळाचा गोडवा देशभरात प्रसिद्ध आहे. या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील दुर्गम भागातील आष्टी हे गाव. सुमारे 12 हजार लोकवस्तीच्या या गावात पारंपरिक पद्धतीचा वापर करून गुळाचे उत्पादन घेतलं जातं. या गावात सुमारे 70 गुळाच्या घाण्या आहेत. येथील ग्रामस्थ त्यातून अवघ्या तीन महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल करतात. आष्टीच्या गुळाला देशभरात मोठी मागणी आहे. कारण हा गूळ कोणत्याही रासायनिक द्रव्याचा वापर न करता तयार केला जातो. त्यामुळे आरोग्यासाठी हा गूळ चांगला असल्याने आष्टीच्या गुळाला मोठी मागणी आहे.

तुमसर तालुका हा जंगलव्याप्त असून आष्टी हे गाव मध्य प्रदेश सीमेच्याजवळ आहे. गावाला लागून जंगल असून एका बाजूने बावणथडी नदी प्रवाहित आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. गावातच ऊसाचे उत्पादन होत असल्याने मागील अनेक दशकांपासून गावात गूळ निर्मितीचे घाणे (पारंपरिक छोटे अंगमेहनतीचे कारखाने) आहेत. सुमारे 12 हजार लोकवस्तीच्या आष्टी गावात 70 पेक्षा अधिक घाणे आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात येथील ग्रामस्थ गावातच गुळाची निर्मिती करतात. अगदी शुद्ग आणि कुठल्याही प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा वापर न करता इथे गुळाची निर्मिती करण्यात येते. या कामासाठी प्रत्येकाकडे किमान 20 ते 25 महिला आणि पुरुष कामगार काम करतात. या माध्यमातून महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे. तीन महिने गुळाचे उत्पादन घेऊन लाखोंची उलाढाल होते. सोबतच कामगारांच्या हाताला काम मिळत असून, हाताने निर्मिती केलेल्या चविष्ट गुळाला मोठी मागणी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी आष्टी गावात येतात. तुमसरच्या मार्केटमधील हाताने तयार केलेला आष्टीचा गूळ देशातील प्रत्येक राज्यात पुरवठा केला जातो. आष्टी हे गाव दुर्गम भागात असले तरी गुळाच्या उत्पादनामुळे या गावाचा गोडवा देशभरात पसरला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम