लम्पीचं टेन्शन होणार कमी ; जिल्ह्यातील सर्वच गुरांचे होणार लसीकरण !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २३ ऑगस्ट २०२३ | जिल्ह्यात सद्य:स्थितीत लम्पी आजाराचा फारसा प्रादुर्भाव नाही. लम्पीची साथ जिल्ह्यात बऱ्यापैकी आटोक्यात असल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ७९ टक्के गुरांचे लसीकरण करण्यात आले असून, आठवडाभरात हे लसीकरण १०० टक्के करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली आहे.

जिल्ह्यात काही भागांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून, या पार्श्वभूमीवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत आढावा बैठक घेतली. गेल्या वर्षी लम्पीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा झालेला प्रादुर्भाव कमी असून, तो वेळीच रोखण्याबाबतच्या सूचना अंकित यांनी दिल्या. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल या तालुक्यांमध्ये एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत लम्पीने बाधित एकही रुग्ण आढळून आले नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

paid add

फिरते पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित होणार
ज्या भागांमधील गुरांचे लसीकरण झालेले नाही, अशा भागात मनुष्यबळ वाढविण्याचा सूचना या बैठकीत देण्यात आल्या; तसेच जि.प.कडून ५ फिरते पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्यात येणार असून जिल्ह्यात ज्या भागात लम्पीचा प्रभाव नाही. त्या भागातील मनुष्यबळ प्रभावित भागात पुरेशी सेवा देण्यासाठी वळविण्यात येणार असल्याचीही माहिती अंकित यांनी दिली. ज्या ठिकाणी लम्पीग्रस्त गुरे आढळून येतील त्या ठिकाणच्या पाणवठे व गोठ्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना अलर्ट मोड़ देण्यात आलेला आहे; तसेच संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. लम्पी आजाराचे संकट आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांची देखील मदत घेण्यात येणार आहे. गरज पडली तर खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचेही जि. प. सीईओंनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम