शेतकऱ्याकडून मागितले पैसे ; त्यांनी शिकविली चांगलीच अद्दल !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शेतकरी संकटात असतांना त्यांच्याकडून पीक विमा कंपनीच्या लोकांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यात समोर आला आहे. तर, पैसे मागणाऱ्या या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पैसे मागणाऱ्या विमा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे हात बांधून थेट पोलीस ठाण्यात त्यांची वरात काढण्यात आली. त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीक विमा कंपनीचे कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी चक्क शेतकऱ्याकडून पैसे घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांचे हात बांधत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील चार-पाच दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी तशा तक्रारी पीक विमा कंपनीकडे केल्या होत्या. त्यानंतर, पीक विमा कंपनीचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील माळहिवडा या गावांमध्ये दाखल झाले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क पैसे मागितले. दरम्यान याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला. तसेच दोघांचे हात बांधून त्यांना पोलीस ठाण्यात नेले. तसेच पोलिसांच्या ताब्यात देऊन कारवाईची मागणी केली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम