कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |नांदेड जिल्ह्यातही परतीच्या पावसाने चांगलाच घोर घातला असून या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळे झाले आहे.
परतीच्या पावसानं कापसाच्या पिकाच्या वाती झाल्या आहेत. तर सोयाबीन पिकाला कोंब फुटले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं सोयाबीनसह कापूस, मूग आणि उडीद ही पिके देखील मातीमोल झाली आहेत.
परतीच्या पावसाचा पिकांना फटका :पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी यामुळे दुबार-तिबार पेरणीनं आधीच शेतकरी राजा मेटाकुटीला आला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आता कापणीस आणि काढणीस आलेले सोयाबीन, मूग, कापूस ही पिकं परतीच्या पावसानं अक्षरशः मातीमोल झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, उमरी, बिलोली ,अर्धापुर, भोकर, नायगाव, माहूर, किनवट,मुखेड, मुदखेड ,धर्माबाद व देगलूर या सर्व तालुक्यात परतीच्या पावसानं कहर केला आहे. गेल्या दहा दिवसापासून जिल्हाभरात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम