उन्हाळी चवळी लागवड पद्धत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १३ डिसेंबर २०२२ I चवळी ही शेंगवर्गातील भाजी असून, महाराष्ट्रात सर्व भागातून तिची लागवड केली जाते. भाजीचे पीक म्हणून चवळीची लागवड मोठ्या शहरांच्या आसपास आणि ग्रामीण भागात मर्यादित स्वरूपात होते. कडधान्य म्हणूनसुद्धा चवळीची लागवड होते. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांतून चवळीची थोड्याफार प्रमाणात लागवड केली जाते. सलग मोठ्या क्षेत्रात व्यापारी तत्त्वावर चवळीची लागवड सध्या करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 8 हजार हेक्टर क्षेत्र चवळीच्या लागवडीखाली असून एकूण उत्पादन 32-35 हजार मे. टन आहे.

पोषक द्रव्ये :-

चवळीच्या बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. विशेषतः शरीर पोषणास आवश्यक असलेल्या लायसिन या अमिनो अ‍ॅसिडचे पुरेसे प्रमाण असल्यामुळे चवळी हे सर्वसामान्य लोकांच्या आहारातील समतोल राखण्यास फारच उपयुक्त आहे. याशिवाय चवळीत फॉस्फऱस, चुना, इतर खनिजे आणि अ, ब आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाणही भरपूर आहे.

पाणी (टक्के ) – 84.06
कार्बोहायड्रेट (ग्रॅ) – 8.00
रिबोफ्लेवीन (मिग्रॅ ) – 0.09
जीवनसत्त्व क (मिग्रॅ) – 13.00
प्रोटिन्स (ग्रॅ) – 4.30
स्निग्ध पदार्थ (ग्रॅ) – 0.20
थायमिन (ग्रॅ) – 0.07
अ जीवनसत्त्व (आययू) – 941
कॅल्शियम (मिग्रॅ) – 80.0
फॉस्फर – 74.00
लोह (मिग्रॅ) – 2.50

जाती –

पुसा फाल्गुनी –

ही जात झुडूपवजा वाढणारी असून उन्हाळी हंगामासाठी अतिशय चांगली आहे. शेंगा गडद हिरव्या रंगाच्या असून 10 ते 12 सेंमीपर्यंत लांब असतात. त्यांचे दोन बहर येतात. लागवडीपासून 60 दिवसांत शेंगांची काढणी सुरू होते. हेक्टरी 90 ते 110 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.

पुसा कोमल –

ही जात करपा रोगास प्रतिकारक असून याचे रोपटे झुडूपवजा व मध्यम उंचीचे असते. 90 दिवसांत पीक तयार होते. हेक्टरी 90 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.

पुसा दो फसली –

ही झुडूपवजा वाढणारी जात असून, उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामांत लागवड करता येते. शेंगा सुमारे 18 सेंमी लांब असून शेंगांची काढणी लागवडीपासून 67 ते 70 दिवसांत सुरु होते. हेक्टरी उत्पन्न 100 क्विंटलपर्यंत मिळते.

पुसा बरसाती

ही जात लवकर येणारी (45 दिवस ) असून पावसाळी किंवा खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे. शेंगा 15 ते 25 सेंमी लांब असून त्यांचे 2-3 बहार येतात. या जातीच्या हिरव्या चवळीचे उत्पादन 85-90 क्विंटल प्रतिहेक्टरी येते.

असीम –

ही जात 80 ते 85 दिवस मुदतीची असून खरीप हंगामासाठी अधिक योग्य आहे. पहिली तोडणी 45 दिवसांत मिळते. एकूण 8 ते 10 तोडण्या 35 ते 40 दिवसांत आटोपतात. या जातीच्या शेंगा फिकट हिरव्या मांसल आणि रसरशीत 15 ते 18 सेंमी लांब असतात. बी पांढर्‍या रंगाचे असून फुले पांढरी असतात. हिरव्या शेंगांचे हेक्टरी उत्पादन खरीप हंगामात 75, तर उन्हाळ्यात 60 क्विंटल असते.

ऋतुराज

झुडूपवजा वाढणारी जात असून पेरणीनंतर उन्हाळ्यात 40 दिवसांनी आणि खरिपात 30 दिवसांनी फुलावर येते. फुले जांभळी असून शेंगा 22 ते 24 सेंमी लांब कोवळ्या असतात. खरीप हंगामात पहिली तोडणी 40 ते 45 दिवसांनी मिळते. त्यानंतर 10-12 तोडण्या होतात. हिरव्या शेंगा आणि बी या दोन्हींसाठी ही जात उपयुक्त असून प्रतिहेक्टरी शेंगांचे उत्पादन 85 क्विंटलपर्यंत मिळते. बियांचे हेक्टरी उत्पादन 10 क्विंटलपर्यंत मिळते. खरीप हंगामात पीक 60 ते 65 दिवसांत आणि उन्हाळी हंगामात 75 ते 80 दिवसांत निघते.

हवामान –

हे उष्ण हवामानातील पीक असून कोरड्या आणि दमट दोन्ही हंगामांत येऊ शकते. मात्र कडाक्याची थंडी सहन करू शकत नाही. तापमान 20 अंशांच्या खाली गेल्यास झाडांना फुले व शेंगा येत नाहीत. मात्र उष्ण तापमान 40 अंश सेंग्रेमध्ये चवळीचे पीक टॅग धरते आणि पाण्याचा चांगला पुरवठा असल्यास जोमाने वाढून उत्पन्न देते.

 

जमीन –
जमिनीच्या बाबतीत हे पीक तितकेसे चोखंदळ नाही. अगदी हलक्या ते मध्यम किंवा आभारी जमिनीतही ते येऊ शकते. पाण्याचा निचरा न होऊ शकणार्‍या भारी चिकन मातीच्या जमिनी या पिकासाठी निवडू नये. लागवड केलेल्या जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. उत्तम निचरा होणार्‍या 6 ते 8.5 आम्ल विम्ल निर्देशांक असलेल्या सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनीत चवळीचे पीक चांगले येते.

पूर्वमशागत व पेरणी

जमिनीचे क्षेत्र नांगरट करून कुळवाने भुसभुशीत करावे. मशागत करताना हेक्टरी 10-15 टन कंपोस्ट अथवा शेणखत टाकावे. भाजीसाठी पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबे तयार करावेत. दोन रोपांतील अंतर 15 सेंमी ठेवून वरंब्याच्या मध्यावर बी टोकावे. दोन सरींमधील अंतर 45 सेंमी ठेवावे.

हल्ली उच्च प्रतीच्या, कोवळ्या व एकसारख्या लांबीच्या शेंगांची मागणी असल्याने झुडूपवजा चवळी पिकाची लागवड गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने करून पीक आणि खतांच्या मात्रा ठिबक सिंचन पद्ध्त वापरून द्यावे. ठिबक सिंचन पद्धत आणि गादीवाफ्यावर लागवड केल्यास शेंगांची प्रत उत्तम मिळून उत्पादन मिळते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम