कृषीसेवक | २४ ऑगस्ट २०२३ | देशात सध्या कांदा प्रश्नी मोठा वाद सुरु असतांना आगामी खरीप हंगामातील २०२३-२४ मध्ये ५२१.२७ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदीचं लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा यात वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी २०२२-२३ मध्ये ४९६ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी करण्यात आली होती. राज्य अन्न सचिव आणि भारतीय अन्न महामंडळच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, भारतीय हवामान विभाग आणि कृषी, शेतकरी कल्याण विभागाचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
आगामी खरीप हंगामातील तांदुळ खरेदीसाठी पंजाबमधून १२२ लाख मेट्रीक टन, छत्तीसगड ६१ लाख मेट्रीक टन, तेलंगणा ५० लाख मेट्रीक टन उद्दिष्ट आहे. त्यापाठोपाठ ओडिशा ४४.२८ लाख मेट्रिक टन, उत्तर प्रदेशमधून ४४ लाख मेट्रीक टन, हरियाणा ४० लाख मेट्रिक टन, मध्य प्रदेश ३४ लाख मेट्रिक टन, बिहार ३० लाख मेट्रिक टन, आंध्र प्रदेश २५ लाख मेट्रिक टन, पश्चिम बंगालमधून २४ लाख मेट्रीक टन, तामिळनाडू १५ लाख मेट्रीक टन तांदुळ खरेदीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
दरम्यान, यावर्षी देशात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी लागवड झाली आहे. कमी लागवड झालेल्या राज्यांमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या खरीप हंगामात आतापर्यंत ओडिशात १८.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम