कृषीसेवक | ८ सप्टेंबर २०२३ | उसाची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर कारखान्यांकडून १५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू केला जावा, असा मतप्रवाह आहे. राज्यासह देशात आगामी २०२३-२४ च्या गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने यंदाच्या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूरचे कारखाने शक्यतो याच कालावधीत सुरू होतात. दुसरीकडे उसाचा वापर चाऱ्यासाठी होऊ लागल्याने पुणे, सोलापूर परिसरातील कारखानदारांकडून हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरु करावा, अशी मागणी होत आहे.
उसाचा दर आणि उतारा या दोन्ही गोष्टी लक्षात घेवून हंगाम दिवाळीनंतर सुरू करणे फायदेशीर ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सरकारच्या वतीने दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत पावसाचा आढावा घेवून ऊस पिकाची उपलब्धता, गाळप, साखर उत्पादन अंदाज घेतला जातो. हंगामाची तारीख, थकीत बिले, मुख्यमंत्री सहायता निधी आदीवर चर्चा करून सर्वसमावेशक धोरण तयार केले जाते. या वर्षीची मंत्री समितीची बैठक या महिन्यात होणे अपेक्षित आहे.
मागील काही वर्षांतील स्थिती पाहिल्यास एक ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान कारखाने चालू करण्यास सरकार अनुकूल असते. मात्र काही कारखाने त्याअगोदर हंगाम सुरू करण्यास धडपडतात. मात्र, यातून साखर उद्योगाचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असते. सोलापूर, पुणे या भागांत कारखाने ऑक्टोबरमध्ये चालू करण्यासाठी तीव्र स्पर्धा दिसते.
मात्र ऑक्टोबरमध्ये कारखाने चालू केल्यास साखर उतारा ८.५ ते ९ टक्के एवढाच मिळतो. तर नोव्हेंबर १५ या काळात ९.५ ते १० टक्के उतारा मिळतो. म्हणजेच अर्धा टक्के उतारा कमी मिळतो. यात शेतकऱ्याचे १५० रुपये प्रती टनाचे नुकसान होते.
मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा येथील कारखाने १५ नोव्हेंबरदरम्यान चालू होतात. परिणामी, ऊस दर, उतारा जास्त मिळतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.महाराष्ट्रातील कारखाने उशिरा चालू झाल्यास शेजारील कर्नाटक राज्यातून उसाची पळवापळवी होण्याचा धोका असतो. मात्र यंदा कर्नाटक सरकारनेसुद्धा कारखाने एक नोव्हेंबरपूर्वी सुरू करण्यास मनाईक केली आहे. सीमाभागातील कारखान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. उशीरा कारखाने सुरू करण्याचा निर्णय गुऱ्हाळांना, गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनासुद्धा लागू करणे गरजेचे आहे. यावर्षी १५ नोव्हेंबरला दीपावली संपत आहे. त्यामुळे या काळातच गळीत हंगाम सुरू करणे साखर उद्योग, शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम