कृषीसेवक | १४ नोव्हेबर २०२३
देशभरातील अनेक शेतकरी शेती सोबत नेहमीच कोणता ना कोणता दुय्यम व्यवसाय करीत असतात. त्यातील अनेक शेतकरी पशुपालन मोठ्या प्रमाणत करीत असतात पण गेल्या काही वर्षापासून या व्यवसायात देखील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यासोबतच दुधाचे दर कमालीचे कमी झाले आहेत. पशूंचा चारादेखील खूप महाग झाला आहे. एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. जर हे दर असेच घसरत चालले तर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण तापू शकते. सणासुदीच्या काळात देखील दर कमी झाल्याने पशुपालक वर्ग अडचणीत आला आहे. चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत.
पाच-सहा महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाचे दर ३८ रुपये इतके होते. परंतु ते आता थेट २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी २६ रुपये दर पाहायला मिळत आहे. यंदा देशातील अनेक राज्यात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर खूप वाढले आहेत. पशुपालकांना चारा जास्त किमतीने विकत घ्यावा लागत आहे. दुधाच्या किमती कमी आणि चारा महाग झाल्याने पशुपालकांचं गणित बिघडलं आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारकडून गाईच्या दुधाचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून गाईच्या दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले होते. यानुसार दूध संघांनी देखील २१ जुलैपासून ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएपला ३४ रुपये दर द्यायची घोषणा केली होती. परंतु रिटर्नचे दर वाढवून एसएनएफच्या प्रतिपॉईंटला ३० पैशाऐवजी १ रुपये व फॅटच्या प्रतिपॉईटला २० पैशांऐवजी ५० पैसे कपात सुरु केली. ५० किलो पेंडेचा दर १ हजार ७०० रुपये इतका आहे. तीन महिन्यांपूर्वी हेच दर १ हजार ५०० रुपये इतके होते. सुग्रास कांडी १ हजार ६०० रुपयांवरून १ हजार ७५० झाली आहे. ऊस आणि चारा कुट्टीचे दर वाढले आहेत. पशुपालक कमालीचे नाराज झाले आहेत. हे दर पूर्वीप्रमाणे कमी करण्यात आले आहेत. पशुसंवर्धनमंत्र्यासह सगळेच नेते याकडे लक्ष देत नाही. एकंदरीतच सरकारने नेमलेल्या समितीसह पशुसंवर्धन विभागदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. पशुपालनाचा व्यवसाय पुन्हा एकदा धोक्यात आला असून आता याकडे सरकार कितपत लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम