कृषी सेवक । १६ फेब्रुवारी २०२३। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात मोठी घट झाली असून याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी नंदूरबार जिल्ह्यातील आम आदमी शेतकरी संघटनेनं केली आहे. दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.
विदर्भनंतर राज्यातील सर्वात मोठा कापूस उत्पादक बेल्ट म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात जवळपास 15 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. लागवड जरी जास्त झाली असली तरी कापसाच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कापसाच्या दरात कधी वाढ होणार या प्रतिक्षेत राज्यातील शेतकरी आहेत. सध्या कापूस उत्पादनाचा खर्च मोठा वाढला आहे.
यावर्षी वाढलेल्या खतांच्या किंमती, बियाणांच्या किंमती तसेच रासायनिक औषधांच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना दुसरीकडे कापसाचे दर मात्र वाढत नसल्याचं चित्र आहे. सध्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. अशा स्थितीत सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आम आदमी शेतकरी संघटनेनं केली आहे. यावर्षी कापसाच्या दरात सातत्यानं चढ-उतार होत असल्याचे चित्र दिसत आहे. भावात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाचे दर हे 9 हजारांच्या आसपास गेले होते. त्यांनतर लगेच हा दर 8 हजार ते 8 हजार 200 रुपयांच्या आसपास आले. कापूस दरातील या अनिश्चिततेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गेल्या वर्षी कापसाला 11 ते 12 हजार रुपयांचा दर मिळत होता. जिनिंग आणि सूत गिरण्यांना कापसाचा पुरवठा मागणीनुसार होत नसल्यानं अडचणी वाढू लागल्या आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम