पॅक हाऊस उभारणीसाठी शासन देणार २ लाखांचे अनुदान

बातमी शेअर करा

 

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. यामध्ये पॅक हाऊस अनुदान योजनेचा देखील समावेश आहे. पॅक हाऊसचा उपयोग हा शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या फुले, औषधी वनस्पती, फळे यांच्या प्रतवारीसाठी केला जातो.

यामध्ये शेतकरी बांधवांना उत्पादित केलेल्या शेतमालाला आवश्यक त्या वजनाचे पॅकिंग करून साठवणूक करता येणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतमालाला अधिक दर मिळणार आहे, कारण की शेतमाल हा प्रतवारी केलेला असणार आहे त्यामुळे साहजिकच मूळ रूप न बदलता शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया होणार असून शेतमालाची गुणवत्ता वाढणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या शेतमालास अधिक दर मिळण्यास मदत होणार आहे.

पॅक हाऊस अनुदान योजनेचे स्वरूप

पॅक हाऊस अनुदान योजना दोन मुख्य प्रकारात राबवली जात आहे. पहिल्या प्रकारांतर्गत फळपिके / औषधी व सुगंधी वनस्पती / भाजीपाला पिके यासाठी या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे किमान ३० ते ५० मे. टन प्रतीवर्ष या क्षमतेच्या पॅक हाउसची उभारणी करण्यासाठी अनुदान दिले जाते. यासाठी आवश्यक साहित्यांवरदेखील अनुदान दिले जाते. शेतमाल वर्गवारी करण्यासाठी ट्रॉली, प्लॅस्टिक क्रेटस्, लिप्टर्स यांसारख्या उपकरणांची आवश्यकता असते. तसेच इतरही अन्य पायाभूत सुविधा पॅक हाऊसमध्ये तयार केल्या जातात.

दुसऱ्या प्रकारांतर्गत फुलांसाठी उभारावयाच्या पॅक हाउससाठी अनुदान देण्याचे प्रावधान आहे. यामध्ये कटफ्लॉवर्स व कंदवर्गीय फुलांसाठी प्रतीवर्ष २ लक्ष फुलदांडे किंवा सुटया फुलांसाठी २० ते ३० टन फुले प्रतिवर्ष या क्षमतेचे पॅक हाऊस उभारणीसाठी अनुदान शासनाकडून शेतकऱ्यांना दिल जात असतं.

पॅक हाऊससाठी अनुदान किती मिळतं

पॅक हाऊस उभारणीसाठी शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त दोन लाख रुपये किंवा प्रकल्प उभारणी खर्चाच्या 50 टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये प्रकल्प खर्चासाठी शासनाकडून चार लाख रुपये एवढा उभारणी खर्च ग्राह्य धरण्यात आला आहे. पॅकहाऊससाठी आवश्यक 600 चौरस मीटर पत्र्याचे शेड बनवण्यासाठी शासनाने तीन लाख रुपये अधिकतम खर्च ग्राह्य धरला असून पॅक हाऊस मध्ये जी काही इतर उपकरणे लागणार आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून एक लाख रुपये एवढा खर्च ग्राह्य धरण्यात आला आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रकल्पासाठी अधिक खर्च लागल्यास म्हणजेच चार लाख रुपये पेक्षा अधिक खर्च लागला तरी देखील शेतकऱ्यांना केवळ दोन लाख रुपयांचच अनुदान मिळणार आहे.

पॅकहाऊससाठी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान किंवा योजनेच्या पात्रता

वैयक्तिक लाभार्थी

राज्य सहकारी संस्था, सहकारी

नोंदणीकृत संस्था

विश्वस्त संस्था

नोंदणीकृत फलोत्पादन संघ (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील)

स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान १५ सदस्य असतील)

शेतकरी महिला गट

तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या

यांना या योजनेअंतर्गत 50% अनुदान किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याचे अनुज्ञेय करण्यात आले आहे.

पॅक हाऊस अनुदान योजनेच्या अटी व शर्ती

पॅक हाऊस अनुदान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या वैयक्तिक अर्जदाराकडे किंवा इतर पात्र संस्थांकडे स्व-मालकीची जमीन असणे अनिवार्य आहे.

संबंधित अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यास शासकीय, निमशासकीय किंवा वैयक्तिक जागेवर प्रकल्प उभारवयाचे असल्यास दुय्यम निबंधकाकडील दिर्घ मुदतीचा (किमान १५ वर्ष) नोंदणीकृत भाडेपट्टा करार असणे आवश्यक असून तत्सम कागदपत्रे संबंधित अर्जदाराला सादर करावे लागणार आहेत.

पॅक हाऊस अनुदान योजनेच्या लाभासाठी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभासाठी पात्र राहील. कुटुंबमध्ये आई, वडील व अज्ञान मुले यांचा समावेश राहणार आहे.

पॅक हाऊस दुरुस्तीसाठी अनुदान मिळत नसून नवीन पॅक हाऊस उभारण्यासाठी अनुदान मिळत.

प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच संबंधित अर्जदाराला अनुदानासाठी ग्राह्य धरलं जातं.

या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी इतर शासकीय योजनेप्रमाणेच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम