शेतकऱ्यांना सुवर्णसंधी : अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे कार्य कौतुकास्पद !

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे प्रतिपादन; अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन; प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी विक्रमी गर्दी

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ४ नोव्हेबर २०२३

तंत्रज्ञानात दररोज बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचे काम अ‍ॅग्रोवर्ल्ड मागील 9 वर्षांपासून करीत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. दरम्यान, प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद लाभला. प्रदर्शनस्थळी शेतकर्‍यांनी विक्रमी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल (एम. जे. कॉलेज) येथे दि. 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान आयोजित अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.3) जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल असून हे प्रदर्शन 6 नोव्हेंबर (सोमवार) पर्यंत सुरु राहणार आहे.

पुढे बोलतांना श्री. जैन म्हणाले की, कधी काळी शिक्षण न घेतलेले, घेतलेच तर 4 थी, 8 वी जास्तीत-जास्त 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेले शेतकरी होते. परंतु, मागील 20 वर्षांपासून कृषी क्षेत्राचे चित्र पालटत आहे. याच शेतकर्‍यांची मुले आता उच्च शिक्षण घेवून शेतीत आधुनिक पद्धतीने चांगले काम करीत आहेत, हे चित्र अभिमानास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

अशोक जैन यांनीही हाताळला इलेक्ट्रिक बैल

इलेक्ट्रिक बैल हा प्रदर्शनाचे आकर्षण ठरत असून प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर अशोक जैन यांनी कृषी व यांत्रिकीकरण विभागाला भेट देवून या इलेक्ट्रिक बैलची माहिती जाणून घेतली तसेच त्याची प्रत्यक्ष हाताळणी केली. पेरणी, कोळपणी, फवारणी, माती लावणे यासारखी सर्व कामे हा इलेक्ट्रिक बैल सहज करत असून या इलेक्ट्रिक बैलच्या खरेदीवर शासनाचे 50 टक्के अनुदान उपलब्ध आहे.

पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांचा विक्रमी प्रतिसाद

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी हजारो शेतकर्‍यांनी प्रदर्शनाला भेट देवून नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात निर्मल सीड्सच्यावतीने पहिल्या पाच हजार शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या भाजीपाला बियाण्याचे पाकीटाचे मोफत वितरण करण्यात आले. प्रदर्शन 6 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, आनंद अ‍ॅग्रो केअर, मेट्रोजेन बायोटेक, कमलसुधा ट्रॅक्टर, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.

आज पुरस्कार वितरण

प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी अर्थात दि.4 (शनिवार) रोजी दुपारी 12 वाजता कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, गट, उद्योजक, कृषी केंद्र संचालक यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी ऋषी, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श कृषी उद्योजक, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श कृषी केंद्र संचालक, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श गट शेती आदी पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम