अंजीर लागवड उत्‍पादनाचा प्रमुख स्रोत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | दक्षिण अरबस्थान हा देश उगमस्थान असणारऱ्या अंजीर या फळझाडाचा प्रसार भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात झाला.
भारतात व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी ३१२ हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकटया पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा १०-१२ गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग होय. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्‍हयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते.
अंजीर हे कमी पाण्‍यावर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर-उस्‍मानाबाद येथे (अंजीराची) लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्‍यावरुन अंजीर हे सर्व दुष्‍काळी भागात उत्‍तम होईल असे म्‍हणायला हरकत नाही.
अंजिराच्या फळातील भरपूर अन्नमूल्ये व पोषणक्षमता यांमुळे अंजिराचे फळ फार पूर्वी पासून खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. अंजिरामध्ये १० ते २८% साखर असून फळ चवीला थोडे आंबटगोड असते. अंजिराच्या फळात चुना, लोह तसेच ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अंजिराच्या फळात इतर फळांच्या तुलनेत भरपूर खनिजद्रव्ये असतात. अंजिराचे फळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. अंजिराचे फळ शक्तिवर्धक सौम्य रेचक, पित्तनाशक आणि रक्तशुद्धी करणारे आहे.
अंजिराचा वापर सध्या बासुंदी, आइस्क्रीम, बर्फी, जॅममध्ये होऊ लागला आहे. अंजिराच्या आकारानुसार त्याचा दर्जा ठरतो. मोठ्या आकाराच्या अंजिराच्या किलोचा भावही जास्त आहे. सर्वसामान्यपणे अंजीर हे उच्चभू्र लोकाचे फळ असा समज होता; पण शहरात आता अंजीर खाण्याबद्दल जागृती होत आहे. अंजीर जितका जुना तितके त्याच्यातील औषधी गुण वाढत जातात. त्यामुळे अशा अंजिराला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून मागणी अधिक असते. लग्नसराई, हिवाळ्याच्या काळात अफगाणी अंजिराला मोठी मागणी होते.

हवामान :
उष्‍ण व कोरडे हवामान अंजिराला चांगले मानवते. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात हे फळ आणखी मोठया क्षेत्रात करायला भरपूर वाव आहे. कमी उष्‍णतापमान या पिकाला घातक ठरत नाही. ओलसर दमट हवामान मात्र निश्चितपणे घातक ठरते. विशेषतः कमी पावसाच्‍या भागात जिथे ऑक्‍टोबर ते मार्चपर्यंत पाण्‍याची थोडीफार सोय आहे अशा ठिकाणी अंजिर लागवडीस वाव आहे.

जमीन :
अगदी हलक्‍या माळरानापासून मध्‍यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्‍तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्‍तम होय. मात्र या जमिनीत चुन्‍याचे प्रमाण असावे. खूप काळया मातीची जमिन या फळझाडाला अयोग्‍य असते. खोलगट आणि निचरा नसलेल्‍या जमिनीत हे झाड पाहिजे तसे चांगले वाढत नाही.

जाती :.
१) पुणेरी अंजीर : ही जात पुरंदर तालुक्यात आणि दौलताबाद परिसरात लागवडीखाली आहे. या जातीस दिवे सासवड असेही म्हणतात. या जातीची फळे ३० – ५० ग्रॅम वजनाची असून गराचा रंग तांबूस असतो. साल पातळ असून गरात साखरेचे प्रमाण १४ -१५ टक्के इतके असते.
२) दिनकर : ही जात मराठवाडा कृषि विद्यापीठाने दौलताबाद परिसरातून निवड करून वाढविली आहे. या जातीची फळे आणि गोडी, पुणे अंजिरापेक्षा सरस असल्याचे नमूद केले आहे.

अभिवृध्‍दी :
अंजिराची अभिवृध्‍दी फाटे कलमाने केली जाते. खात्रीच्‍या बागायतदाराच्‍या रोगमुक्‍त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून नंतर त्‍यातून उत्‍महाराष्‍ट्रम व दर्जेदार फळे देणारी झाडे निवडावीत व अशा झाडावरील १.२५ सेमी जाडीच्‍या आठ ते बारा महिने फांदया कलमासाठी निवडतात. लावण्‍यासाठी फाटेकरताना फांदीच्‍या तळाचा भाग व शेंडयाकडील कोवळा भाग छाटून टाकावा व मधला भाग रोपे तयार करण्‍यासाठी वापरावा. फाटे कलम तीस ते चाळीस सेमी लांब असावेत. त्‍यावर किमान चार ते सहा फूगीर व निरोगी डोळे असावेत. कलमांचा तळाचा काप डाहेळयाच्‍या काही खाली घ्‍यावा. आणि वरचा काप डोळयाच्‍या वर अर्धा सेमी जागा सोडून घ्‍यावा. दोन्‍ही काप गोलाकार घ्‍यावेत. फाटे कलम गादी वाफयावर ३० × ३० सेमी वर किंवा दोन डोळे मातीत जातील अशी लावावीत. कलमे किंचीत तिरिपी करावीत. लावण्‍यापूर्वी कलमाच्‍या बुडांना आय.बी.जे. किंवा सिरेडिक्‍स यासारखे एखादे मूळ फोडणारे संजीवक लावले तर मुळया लवकर फूटतात.

लागवड :
अंजिराच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन उन्हाळ्यात तयार करावी. ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात १ किलो सुपर फॉस्फेट आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून खड्डे १:२ या प्रमाणात शेणखत व पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने पावसाळ्यापूर्वी भरावेत. लागवड जून – जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावी. लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे. कलमांना बांबुंचा आधार द्यावा. कलमांना जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी या प्रमाणे द्रावण तयार करून २५० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेंचिंग) करावे. म्हणजे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे कलमांची वाढ लवकर जोमदार होते.
अंजिराची लागवड जून – जुलै ते सप्टेंबर – ऑक्टोबर या महिन्यात करावी. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ x ६ किंवा ५ x ५ मीटर अंतर ठेवावे.

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम