बदलणाऱ्या काळात जनावरांची घ्या विशेष काळजी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | उन्हाळ्यात तापमानात वाढ होते, गरम वारे वाहू लागतात, अशा बदलणाऱ्या काळात जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात जनावरांच्या वजनात चांगली वाढ होते. हा ऋतू प्रजननासाठी अतिशय उत्तम असल्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त जनावरे गाभण असतात. त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

 

गोठा नियोजन –

उन्हाळ्यात जास्त तापमानापासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक ते बदल करून घ्यावेत. रात्री व पहाटेच्या वेळेस ज्या वेळेस वातावरण थंड असते, त्या वेळेस जनावरांना खाद्य द्यावे.
जमिनीवर भुसा किंवा गोणपाट पसरून त्यावर नवजात वासरांना ठेवावे, जेणेकरून त्यांचे अति गरम वातावरणापासून संरक्षण होईल. गोठ्यातील जमीन कोरडी व थंड राहील याची काळजी घ्यावी.
मुक्त संचार गोठ्यात दिवसाच्या वेळेस जनावरांना निवाऱ्याची सोय एका बाजूला करावी.

प्रतिबंधात्मक उपाय –

तापमानात होणारी वाढ यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडू शकतात, त्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला सहा महिने वयाच्या पुढील गाई, म्हशींना लसीकरण करून घ्यावे.
लसीकरणापूर्वी सर्व जनावरांना जंतनाशक पाजावे. लसीकरणामुळे जनावरांना पूर्णपणे रोगप्रतिकारक शक्ती मिळू शकेल.
शेळ्या, मेंढ्यांना देवी रोगाविरुद्ध लसीकरण करावे, लसीकरण केल्याच्या नोंदी ठेवाव्यात.

प्रजनन व्यवस्थापन –

म्हशी हिवाळ्यात रेतन होतात. या काळात गाभण असतात. त्यामुळे गाभण काळाकडे विशेष लक्ष द्यावे. पुरेसा आहार द्यावा.
काही जनावरे उन्हाळ्याच्या सुरुवातीलासुद्धा रेतन होतात.
माजावर न येणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. आवश्यक तो उपचार करून घ्यावा.
क्षार खनिजे व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघेल, जनावर गाभण राहण्यास मदत होईल.
माजाची लक्षणे ओळखण्यासाठी जनावरांचे पहाटे व संध्याकाळी निरीक्षण करावे.

वासरांचे संगोपन –

आहार व आरोग्याचे योग्य नियोजन केल्यावरच जनावरांची चांगली पिढी तयार होऊ शकते, म्हणून त्यांची विशेष काळजी घ्यावी.
नवजात वासरांना गरम वाऱ्यापासून संरक्षण करावे.
जन्मलेल्या नवजात वासरांना स्वच्छ करून त्यांच्या नाका-तोंडातील चिकट पदार्थ काढावा. नाळ शरीरापासून दीड ते दोन इंचावर दोऱ्याने बांधून नवीन ब्लेडने कापावी. कापलेली नाळ आयोडिनयुक्त द्रावणात बुडवावी.
जन्मलेल्या वासरांना वजनाच्या १० टक्के चीक २४ तासांच्याआत पाजावा. त्यानंतर १० टक्के दूध पाजावे.
दोन महिन्यांनंतर दूध कमी करून त्याऐवजी मिल्क रिप्लेसर व इतर पूरक खाद्य द्यावे. जन्मल्यावर १५ दिवसांनी पहिला जंताचा डोस द्यावा. त्यानंतर दर तीन महिन्यांनी जंताचे पुढील डोस द्यावेत.

शेळ्यांचे व्यवस्थापन –
उन्हाळा जास्त असल्यास शेळ्यांना वातावरण थंड असेल अशा वेळी चारावयास सोडावे. उन्हाचा थकवा घालवण्यासाठी पशूतज्ज्ञाच्या सल्याने लिव्हर टॉनिक व जीवनसत्वे द्यावीत.

आहार नियोजन –

गरम वातावरणात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अधिक ऊर्जा असलेला चारा तसेच पशुखाद्य जनावरांना द्यावे.
पशुखाद्याच्या मात्रेत अर्धा ते एक किलो प्रति जनावर वाढ करूनही ही गरज भागवता येते.
गव्हाच्या काडावर, सोयाबीन व हरभऱ्याच्या भुश्श्यावर युरिया व गुळाची प्रक्रिया करून निकृष्ट चाऱ्याची सकसता वाढवावी. त्यासाठी १०० किलो चाऱ्यासाठी ३ किलो युरिया, १ किलो गूळ, १ किलो मीठ व २० लिटर पाणी वापरून प्रक्रिया करून २१ दिवस हवाबंद करून नंतर हा चारा वापरावा.
काही ठिकाणी जनावरांच्या आहारात उसाच्या वाढ्याचा चारा म्हणून वापर केला जातो. वाढ्यामध्ये ऑक्झलेट नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. हा घटक जनावरांकडून पचवला जात नाही, तसेच शरीरातून बाहेर पडताना कॅल्शिअमबरोबर ‘कॅल्शिअम ऑक्झलेट’ नावाचे संयुग बनवून कॅल्शिअमलाही बाहेर घेऊन जातो. हे टाळण्यासाठी एक किलो कळीचा किंवा दगडी चुना पाण्यात रात्रभर भिजत घालावा. त्यावर तयार होणारी निवळी वाढ्यावर फवारून २४ तासांनी वाढे जनावरांना खाऊ घालावे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम