द्राक्षाची लाल रंगाचे नवीन वाण विकसित !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १२ फेब्रुवारी २०२३।  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागाईतदार संघानं द्राक्षाचे नवीन वाण विकसित केलं आहे. पुण्यातील मांजरीच्या फार्म प्रयोगशाळेत हे नवे द्राक्ष वाण विकसित केले आहे. विकसीत करण्यात आलेले नवीन वाण हे सुगंधी लाल रंगाचे आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या वाणाच्या संशोधनाचं काम सुरु होतं. चालू हंगामात हा द्राक्ष वाणाचा प्लॉट काढणीला आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, उत्कृष्ट चव, वजन आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघास यश आलं आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागात, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरण परिस्थितीत या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशानं मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी सदर वाणाची काही रोपे देण्यात आली होती. सर्व प्लॉट्सवर या वाणाबाबत समाधानकारक अभिप्राय प्राप्त झाले आहेत. या चाचणी दरम्यान प्राप्त झालेल्या अभिप्राय आणि सूचनांचा अभ्यास करून या वाणात अजून काही सुधारणांची शक्यता तपासली जाणार आहे.

देशात द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा एकछत्री अंमल असून आकर्षक रंग आणि मधुर चवीच्या द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते. सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल असा विश्वास महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघ सातत्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ देत आहे. तसेच अधिकाधिक सक्षम, निरोगी आणि उत्पादनक्षम द्राक्ष वाणांच्या विकासनासाठी जागरूकपणे कार्य करत आहे.

नव्याने विकसित करण्यात आलेले वाण हे सध्याच्या क्रिमसन जातीपेक्षाही सुधारित आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक बाजारपेठेत देखील याला चांगला दरर मिळणार आहे. मांजरी फार्म प्रयोगशाळेसोबतच तळेगाव वणी (जि. नाशिक) येथील प्रक्षेत्रावर सुमारे एक हजार झाडांचा प्लॉट उभारण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम