नवीन पिढीला दिशादर्शक कृषी प्रदर्शन – आ. चिमणराव पाटील

बातमी शेअर करा

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | ॲग्रोवर्ल्ड गेल्या आठ वर्षांपासून जळगावमध्ये नियमितपणे कृषी प्रदर्शन आयोजित करीत आहेत. प्रत्येक प्रदर्शनात शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्याच्या आयोजनावर त्यांचा भर असतो. यंदा देखील मजूर समस्या तसेच फळबागांसाठी आवश्यक असणारे पान-फुल, खत, कीड, रोग, पाणी याची स्वयंचलित सूचना देणारे तंत्रज्ञान, करार शेती, अपारंपरिक पिके, कमी पाण्यातील शाश्वत उत्पादन देणारी पिके, नवनवीन यंत्र व अवजारे असे हे बहुउपयोगी तसेच नवीन पिढीला दिशादर्शक ठरणारे कृषी प्रदर्शन आहे. प्रदर्शन पाहून वैयक्तिक मला खूप समाधान मिळाले. तरी शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.

आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेजच्या मैदानावर अ‍ॅग्रोवर्ल्डच्या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला आजपासून (शुक्रवारी) सुरवात झाली. हे कृषी प्रदर्शन 14 नोव्हेंबरपर्यंत असून शेतकऱ्यांसाठी मोफत आहे. प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स आहेत.

कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार चिमणराव पाटील, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे विपणन प्रमुख अभय जैन, साईराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, निर्मल सीडसचे संचालक डॉक्टर सुरेश पाटील, प्लॅन्टो कृषी तंत्रचे संचालक निखिल चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जळगावातील हे आठवे कृषी प्रदर्शन असून एक लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्कारांचे आज वितरण-
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते “ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव” पुरस्कारांचे आज प्रदर्शनस्थळी दुपारी 12 वाजता वितरण होणार आहे. आमदार शिरीष चौधरी, आमदार किशोर पाटील हे देखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. उल्लेखनीय कार्य केलेले शेतकरी, अधिकारी, शास्त्रज्ञ व कृषी उद्योजक अशा 24 जणांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे.

प्रदर्शनात काय पहाणार..?? मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी फळभाज्या – भाजीपाला, बांबू, सुबाभूळ याच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच बँक कर्जाबद्दल माहिती, दूध काढणी यंत्र, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत.

जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पूर्वा केमटेक, नमो बायोप्लांट्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम