तूर पिकाची अशी घ्या काळजी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची नोंद असली, तरी प्रामुख्याने कळ्या व फुलोरा अवस्थेतील किडीपासून जास्त प्रमाणात नुकसान होते. यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

तूर पिकावरील महत्त्वाच्या किडीची माहिती जाणून घ्या व उत्पादनातील घट टाळा.

शेंगा पोखरणारी अळी –

शास्त्रीय नाव – हेलीकोव्हर्पा आर्मिजेरा.

किडीच्या चार अवस्थांपैकी अळी अवस्था ही अधिक हानिकारक आहे. या किडीचा पतंग शरीराने दणकट असून, पिवळसर रंगाचा असतो व पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात. मादी पतंग फुलोरा अवस्थेत आल्यावर अंडी घालण्यासाठी आकर्षित होतात. सदर अळी ८० टक्के कळी, फुले व शेंगावर अंडी घालतात. अंडी अवस्था ३ ते ४ दिवसांची असते. पूर्ण विकसित अळी पोपटी रंगाची असते. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी अवस्था १७ ते २३ दिवस असते.
प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या तुरीची कोवळी पाने व कळ्या यांचे नुकसान करतात. शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाणे खातात. एक अळी साधारणतः २० ते २५ शेंगांचे नुकसान करते. ही अळी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत क्रियाशील असते. प्रति झाड एक अळी असल्यास हेक्टरी १३८ किलो घट व एका झाडावर तीन अळ्या असल्यास ३०८ किलो प्रति हेक्टरी घट आढळते.

*पिसारी पतंग –*

शास्त्रीय नाव – एक्झेलास्टीस इटिओमोसा

किडीचा पतंग नाजूक निमुळता करड्या व भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख लांब दुभंगलेले असून त्यांच्या कडावर नाजूक केसांची दाट लव असते, त्यामुळे त्यांना पिसारी पतंग म्हणतात. या किडींचे पाय लांब व बारीक असतात. अळी हिरव्या रंगाची साधारणपणे १५ मिमी लांबीची मध्ये फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती असते. पाठीवर काटेरी लव असते. अंड्यातून बाहेत निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून खाते, पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरडून खाते. नंतर शेंगांना, शेंगांच्या बाहेर राहून खाते. ही अळी शेंगांच्या आत कधीच शिरत नाही. अळी अवस्था ११ ते १६ दिवसांची असते. ही अळी पावसाळा संपल्यावर तुरीवर मोठ्या प्रमाणात येते.

*शेंगमाशी –*

हेलिकोव्हर्पा अळीनंतर शेंगमाशी पिकांचे सर्वांत जास्त नुकसान करते. शेंगमाशी आकाराने लहान १.५ मिमी लांब असून, माशीचा रंग हिरवट असतो. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिच्या तोंडाकडील भाग निमुळता असतो. अळी शेंगेतच कोष अवस्थेत जाते. सुरवातीला या किडीचे कुठलेही लक्षण शेंगेंवर दिसत नाही. अंडे घालण्याचा कालावधी डिसेंबर ते जानेवारी असते. ही अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते, त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. उत्पादनात १० ते ५० टक्के घट आढळून येते.
—————————–\

बातमी शेअर करा
#tur
Comments (0)
Add Comment