कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. उथळ आणि हलक्या जमिनीत फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि हंगामही लवकर संपतो. भारी, काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. चुनखडीयुक्त, हरळी आणि लव्हाळायुक्त जमिनीत निशिगंध लागवड करू नये.
लागवड शक्यतो एप्रिल- मे महिन्यात करावी. लागवडीसाठी २० ते ३० ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. १५ ग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीस वापरल्यास फुले येण्यास सहा ते सात महिने लागतात. निवडलेल्या कंदांवर लागवडीपूर्वी शिफारशीत बुरशीनाशकाची बेणेप्रक्रिया करावी.
लागवडीसाठी सरी-वरंबा अथवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी. हेक्टरी ४० ते ५० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. सरी, वरंब्यावर ३० सें. मी. x ३० सें. मी. अंतरावर कंदांची लागवड करावी. वाफे शक्यतो तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे करावेत. सपाट वाफ्यात लागवड करताना दोन ओळींत ३० सें.मी. आणि दोन कंदांमध्ये २५ सें. मी. अंतर ठेवावे. कंद जमिनीत पाच ते सात सें. मी. खोल पुरावेत. निमुळता भाग वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकावेत आणि शेतात त्वरित पाणी द्यावे.
माती परीक्षणानुसार हेक्टरी २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि १/४ नत्राचा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. राहिलेले नत्र तीन समान हप्त्यांत लागवडीनंतर ३०, ६० आणि ९० दिवसांनी द्यावे. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केल्यापासून पहिल्या तीन-चार महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली, तर पिकाची वाढ जोमाने होते.
जाती :
१) सिंगल : या प्रकारातील फुले पांढरी शुभ्र असून, अत्यंत सुवासिक असतात. या प्रकारामध्ये सिंगल, शृंगार, प्रज्वल या जाती आहेत. ही फुले हार, वेणी, गजरा, माळा यांसाठी वापरतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले रजनी ही जात विकसित केली आहे. ही जात सुट्या फुलांच्या अधिक उत्पादनासाठी व कटफ्लॉवर म्हणून फुलदाणीत ठेवण्यासाठी चांगली आहे.
२) डबल : या प्रकारामध्ये स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव या जाती आहेत. या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. सेमी डबल या प्रकारच्या जातीची फुले फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात.
३) व्हेरिगेटेड : या प्रकारामध्ये सुवर्णरेखा व रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी लावण्यासाठी चांगल्या आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम