कारले लागवड तंत्रज्ञान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | वेलवर्गीय पिकात कारले हे एक महत्वाचे, कमी कालावधीत अधिक उत्पन्न व नफा मिळवून देणारे पिक आहे. कारल्याच्या औषधी गुणधर्मामुळे यास भारतीय तसेच परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कारल्याच्या नियमित सेवनाने मधुमेह व हृदयविकारासारखे आजार आटोक्यात येतात. कारल्यामध्ये जीवनसत्व अ, आणि क, प्रोटीन, कार्बोहाड्रेट पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्परस, चुना अधिक प्रमाणात आहेत. कारल्याचा कडूपणा त्यातील मोमोरडीसिन या द्रव्यामुळे असतो. कारल्याच्या रसाचा वापर पित्तनाशक म्हणून करतात.

हवामान :
कारल्याची लागवड पावसाळी (जून) व उन्हाळी (जानेवारी) हंगामात करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. कारल्याच्या वेलीवर जास्त थंडीचा परिणाम होतो. हिवाळयात कमी प्रमाणात वेलींची वाढ खुंटते, तसेच परागकण तयार होणे, त्याचे मादी फुलावर सिंचन होणे या क्रियांवर परिणाम होतो. थंड व कोरडया हवामानात कारल्यावर भुरी रोगाचा प्रादूर्भाव होतो. कारल्याच्या वेलीची वाढ व उत्पादन सरासरी २४ ते २७० सेल्सीअस तापमानात चांगल्या प्रकारे होते. खरीप हंगामातील लागवडीत ङ्गळमाशीचा उपद्रव जास्त प्रमाणात होतो.

जमीन :
पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी हलकी ते मध्यम काळी जमीन उत्तम आहे. जास्त काळ पाणी धरून ठेवणारी चोपण जमीन शक्यतो टाळावी. जमिनीचा सामू ६ ते ६.७ आणि सेंद्रिय खताचा पुरवठा असणारी असावी.

सुधारित व संकरित जाती :
म.फु.कृ.वि. राहुरी – फुले प्रियंका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्वला, हिरकणी
कोकण कृषी विद्यापीठ – कोकण तारा
केरळ कृषी विद्यापीठ – प्रिया, प्रिती, प्रियंका
इतर जाती – अर्का हरित, कोईमतूर लॉंग, पुसा-दो-मोसमी, पुसा विशेष काशी उरवशी
संकरित जाती – अमनश्री, बीजीएच-११०(सिंजेन्टा), पारस, आर. के.-१६३,माही व्हेनचुरा(महिको)

पूर्वमशागत व लागवड :
जमिनीची नांगरणी करून जमिनीमधील तण व गवत वेचून शेत स्वच्छ करावे. नांगरणीनंतर जमीन तापू द्यावी. कुळवाच्या पाळया घालून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ टन शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ताटी पध्दतीत १.५ मीटर व मंडप पध्दतीत २.५ मीटर दोन ओळीत अंतर सोडावे. ६० से.मी. रूंदीच्या स-या पाडाव्यात व दोन वेलीमधील अंतर १ मीटर ठेवावे. लागवडीच्या वेळेस सरीमध्ये प्रति हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश टाकावे. सरीच्या ज्या बाजूस टोकणी करायची असेल त्या बाजूने स-या चांगल्या घोळून घ्याव्यात म्हणजेे खते मातीत चांगल्या प्रकारे मिसळतील त्यानंतर त्या सरीच्या मध्यावर एका ठिकाणी २ ते ३ बियांची १ मीटर अंतरावर टोकणी करावी. हेक्टरी २ किलो बियाणे पुरेसे होते.

वेलीला आधार देण्याच्या पध्दती :
अ) ताटी पध्द्त :
ताटी पध्दतीसाठी कारल्याची लागवड १.५ द्बमी. अंतरावर करतात. यासाठी रिजरच्या साहाय्याने १.५ मीटरच्या अंतरावर सरी पाडावी व प्रत्येक पाच मीटर अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सर्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकाला १० फूट उंचीचे व ४ इंच जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरच्या बाजूस झुकतील या पद्धतीने २ फूट जमिनीत गाडावेत, त्यांना दोन्ही बाजूने १० गेज तारेने ताण द्यावा. नंतर प्रत्येक ७ ते ८ फुटांवर, ८ ङ्गुट उंचीचे बांबू एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी. नंतर जमिनीपासून २ ङ्गूट अंतरावर जमिनीला समांतर येईल अशी तार ओढावी. दुसरी तार जमिनीपासून ४ ङ्गूट उंचीवर व तिसरी ६ फूट उंचीवर ओढावी. नंतर वेलीचे बगलफुटवे साधारणतः २ फूट उंचीपर्यंतचे काढून टाकावेत.

ब) मंडप पद्धत :
१) या पध्दतीमध्ये. अडीच बाय एक मीटर अंतरावर कारल्याची लागवड करतात. त्यासाठी अडीच मीटर अंतरावर रिजरने सरी पाडावी. नंतर जमिनीच्या उतारानुसार पाणी चांगले बसण्याच्या दृष्टीने दर पाच ते सहा मीटर अंतरावर आडवे पाट पाडावेत व रान व्यवस्थित बांधून घ्यावे.
२) मांडवाची उभारणी करताना शेताच्या सर्व बाजूंनी एक आड एक सरी सोडून म्हणजे पाच मीटर अंतरावर १० फुट उंचीचे आणि चार उंच जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूस झुकतील अशा पध्दतीने दोन फूट जमिनीत गाडावेत.
३) डांबाच्या खालच्या बाजूवर डांबर लावावे म्हणजे जमिनीत गाडल्यावर ते कुजणार नाहीत. प्रत्येक डांबास बाहेरच्या बाजूने १० गज जाडीच्या तारेने ताण द्यावेत. त्यासाठी एक ते दीड फूट लांबीच्या निमुळत्या दगडास दुहेरी तार बांधून तो दगड दोन फूट जमिनीत पक्का गाडावा.
४) नंतर डांब बाहेरील बाजूस ओढून ६.५ फूट उंचीवर ताणाच्या तारेने पक्का करावा. तार खाली घसरू नये, म्हणून तारेवर यू आकाराचा खिळा ठोकून तार पक्की करावी. अशा रितीने डांबाला ताण दिल्यानंतर १० गेजची दुहेरी तार पीळ देऊन ६.५ फूट उंचीवर यू आकाराचा खिळा ठोकून त्यात ओवून पुलावरच्या सहाय्याने व्यवस्थित ताणून घ्यावी.
५) तसेच चारही बाजूने समोरासमोरील लाकडी डांब एकमेकांना १० गेजच्या तारेने जोडून घ्यावेत आणि पुलारच्या सहाय्याने ताण आकाराचा चौरस तयार होईल. त्यानंतर वेलाच्या प्रत्येक सरीवर आठ फूट अंतरावर बांबूने (१० फूट उंच व दोन इंच जाड) वेलाच्या तारेस आधार द्यावा म्हणजे मंडपास झोळ येणार नाही. तसेच वा-याने मंडप हबकणार नाही.
६) मंडप उभारणीचे काम वेल साधारण एक ते दीड फुट उंचीचे होण्याआधी पूर्ण होणे गरजेचे आहे. मंडप तयार झाल्यानंतर साधारण ६.५ ते सात ङ्गुट लांबीची सुतळी घेऊन तिचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस बांधावे, व दुसरे टोक वेलीवरील तारेस बांधावे व वेल त्या सुतळीस पीळ देऊन तारेवर चढवावा.
७) वेल सुतळीच्या साहाय्याने वाढत असतानाच बगलङ्गुट आणि तणावे काढावेत. पाच फूट उंची झाल्यानंतर बगलङ्गुट व तणावे काढणे थांबवावे. मुख्य वेल मांडवावर पोहोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा व राखलेल्या बगलफुटी वाढू द्याव्यात.
८) वेलींना आधार आणि वळण देणे गरजेचे व फायदेशीर आहे. जमिनीत बीया टाकल्यानंतर, साधारणतः ८ ते १० दिवसांत उगवून येतात. चांगले वाढ असलेले रोप ठेवून बाकीचे काढून टाकावेत.
९) वेलीच्या जवळ १ फुटाच्या लहान काटक्या रोवून घ्याव्यात. तर त्या काटक्यांना सुतळी बांधावी व वेलीच्या अगदी बरोबर वरून आडव्या जाणा-या तारेला दोन पदरी सुतळी बांधावी. नंतर वेल जसा वाढेल तसा तो त्या तणावाच्या साहाय्याने दोरीवर चढत जातो.
१०) वेली दोरीच्या हेलकाव्याने खाली पडणार नाहीत तसेच शेंडे मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. वेलीच्या फुटी जशा वाढतील तशा मांडवाच्या तारेवर आडव्या पसरून घ्याव्यात.

आंतरमशागत :
बियांच्या उगवणीनंतर १ ते १.५ महिन्यांनी मूळच्या स-या मोडणे व हेक्टरी ५० किलो नत्राची मात्रा द्यावी. दोन वरंब्याच्या मधील पट्टा चाळून घ्यावा व लिंबोळी पेंड किंवा करंज पेंड द्यावी. तणे असतील तर खुरपणी करून घ्यावी.

फळधारणेसाठी उपाय :
नैसर्गिक फळधारणा कारल्यामध्ये होत असते. परंतू अधिक उत्पादन वाढण्यासाठी संजीवकांचा वापर फायदेशीर ठरतो. बी उगवून रोप दोन पानांवर आले असता १० दिवसाच्या अंतराने मॅलिक हायड्रासाईड १५० पी.पी.एम किंवा एन.ए.ए. १०० पी.पी.एम या संजीवकाचे द्रावण दोन वेळा फवारणी केल्यास मादी फुलांचे प्रमाण वाढून, उत्पादनात भर पडते.

पाणी व्यवस्थापन :
कारली पिकास नियमित पाणी देणे गरजेचे असते. ङ्गळे लागणीच्या काळात पाणी नियमितन दिल्यास फळांची प्रत कमी होते, फळे वेडीवाकडी होतात. अधिक पाणी दिल्यास वेली पिवळया पडतात. खरीप हंगामात पाऊस नसेल त्या वेळेस ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. हलक्या जमिनीत गरजेनुसार पाणी द्यावे.

कारल्यावरील रोग : कारली पिकास केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
1) केवडा :
खरीप लागवडीत उष्ण व दमट हवेत केवडयाचे प्रमाण जास्त असते. या रोगामुळे पानाच्या खालच्या भागांवर पिवळे डाग पडतात, ते वाढत जाऊन काळसर होतात नंतर पान वाळून जाते.
उपाय : रोगाची लक्षणे दिसताच एसआरपी – २०० ग्रॅम + सुदामा – ५० मिली चिलेटेड झिंक – १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
ड्रीप – मॅक्सवेल एस – २.५ किलो + हंस – ५०० मिली प्रति एकर ड्रिपमधून द्यावे.

2) भुरी :
हा रोग जुन्या पानापासून सुरू होतो. थोड्या थंड आणि कोरडया हवेत पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. नंतर ती पानांच्याया पृष्ठभागावरही पसरते. त्यामुळे पाने पांढरे पीठ शिंपडल्यासारखी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढले की पाने गळून पडतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पी.एम.प्रोटेक्ट – १५० मिली + सिलिस्टिक – ५० मिली प्रति १०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

कारल्यावरील कीड :
कारली वेलवर्गीय पिकावर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी अळी व मुळावरील कृमी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो.

1) फळमाशी : फळमाशी ही कीड खरीप आणि उन्हाळी हंगामात आढळते. खरीपात विशेषकरून जास्त प्रादुर्भाव होतो. किडीचे पतंग मादी कळीच्या त्वचेमध्ये अंडी घालतात. अंडी उबवून अळया फळांमध्ये वाढतात आणि त्या पूर्ण वाढीनंतर भोके पाडून बाहेर पडतात. फळमाशी लागलेली फळे लगेच ओळखता येतात. ती बहुधा वाकडी असतात. जेथून वाकतात तेथूनच अळीचे छिद्र दिसते आणि बरीचशी फळे त्याजागी पिकलेली दिसतात.
उपाय : अशी फळे दिसताक्षणीच तोडून, पुरून किंवा जाळून टाकावीत. पिकावर हिंट २ मिली प्रति लिटर पाण्यातून फुले येण्यास सुरूवात झाल्यावर फवारावे. एका आठवड्याच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या केल्यास कीड आटोक्यात येते.

फेरोमेन ट्रैप
2) तांबडे भुंगेरे : ही कीड कारली पिेकावर रोपे लहान असताना दिसून येते. हे नारंगी तांबडया रंगाचे कीटक बी उगवून अंकुर आल्यावर त्याच्यावर तुटून पडतात. आळ्या व भुंगेरे दोन्हीपासून पिकाचे नुकसान होते. पानावर छिद्रे दिसतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी फेरोमॅन ट्रॅप ( एकरी ४) लावावेत. फवारणीसाठी हिंट २ मिली प्रति लिटर या प्रमाणात वापरावे.

तोडणी व प्रतवारी :
बियांच्या उगवणीनंतर साधारणपणे ६० दिवसात पहिला तोडा निघतो आणि त्यानंतर दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तोडे होतात. वेलीची चांगली निगा ठेवली तर १५ ते १७ तोडे मिळू शकतात. फार कोवळी किंवा जुनी फळे तोडू नयेत. तोडणी नेहमी सकाळी नऊच्या आत करावी. फळे तोडल्यावर लगेच सावलीत ठेवावीत. किडकी, पिवळसर आणि वाकडी फळे वेगळी करावीत. सरळ आठ ते दहा इंच लांब हिरव्या आणि काटेरी फळांना चांगला भाव मिळतो. त्या दृष्टीने प्रतवारी करावी निवडलेली फळे बांबुच्या पाटया किंवा लाकडी खोक्यात व्यवस्थित रचून भरावीत. फळे भरण्यापूर्वी पाटया किंवा खोक्याच्या तळाशी लिंबाचा पाला भरावा. शक्य असल्यास त्यावर वर्तमानपत्राचा कागद टाकून नंतर फळे रचावीत. अशा प्रकारे भरून पाठविलेली फळे गिर्हाईकाच्या हाती चांगल्या अवस्थेत पडतात. त्यामुळे साहजिकच चांगला भाव मिळतो. लागवडीनंतर ६० ते १५० दिवसांपर्यंत वेलीला कारली येत राहतात. हेक्टरी संकरीत जातीचे २०० ते २५० क्विंटल उत्पादन तर सरळ जातीचे १५० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम