खरीप हंगामात वाढणार ‘या’ पिकाची लागवड! कोणत्या पिकांची किती पेरणी होणार?
यंदा महाराष्ट्रात सुमारे १ कोटी ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड होणार आहे.
पुणे: यंदा मान्सूनचा पाऊस ३० मे रोजी भारताच्या मुख्य भूमीवर पोहोचला असून महाराष्ट्रात लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली असून बियाणे आणि खतांची खरेदी तसेच मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. यंदा राज्यात सुमारे १ कोटी ४३ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणार आहे.
खरीप हंगामात महाराष्ट्रात मुख्यतः सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, कडधान्ये आणि तृणधान्ये यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा अंदाजित ५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होणार आहे, तर कापसाचे क्षेत्र ४० ते ४२ लाख हेक्टर असेल. कापसाच्या सुधारित वाणांमुळे २००० सालापासून कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यंदा भात पिकाची लागवड १५ लाख हेक्टरवर होणार आहे, जे मागील काही दशकांपासून स्थिर आहे. खरीप ज्वारीची लागवड १ लाख ५० हजार हेक्टरवर केली जाणार आहे. बाजरीचे क्षेत्र ६ लाख हेक्टर आणि नाचणीचे क्षेत्र सुमारे ८० हजार हेक्टर असेल, अशी माहिती कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. यंदा पावसाची स्थिती चांगली असल्यामुळे या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
कोणत्या पिकाचे क्षेत्र वाढणार?
मागील हंगामात म्हणजे २०२३-२४ मध्ये सोयाबीन, कापूस, कांदा आणि इतर अन्नधान्यांना चांगला दर मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, तुरीला चांगला दर मिळाल्यामुळे यंदा तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सध्याचे तुरीचे दर ९ हजार ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा तुरीकडे अधिक कल असेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम