असे करा बंदिस्त शेळीपालन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | बंदिस्त शेळीपालन करताना सर्वसाधारणपणे १०० शेळ्यांचा कळप हा फायदेशीर ठरतो. साधारणतः २५ ते ३० माद्यांमागे १ नर ठेवल्यास पुरे होते. अशावेळेस नर जवळच्या बाजारातून विकत घ्यावेत. दर तीन महिन्यांनी अशा प्रकारच्या २५ माद्या व एक किंवा दोन नर घ्यावेत म्हणजे वर्षांच्या शेवटी शंभर माद्या व चार ते आठ नर उपलब्ध होतील.

शेळी प्रामुख्याने स्वतःच्या मर्जीने फिरणारा व चरणारे प्राणी असल्याकरणाने त्यांना नैसर्गिक सवयींपासून वंचित करताना त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांचाही विचार होणे आवश्यक आहे. बंदिस्त गोठ्यात मलमूत्राचा अतिशय ऊग्र वास येत असतो. तसेच पावसाळ्यात शेळ्यांना आद्रतेचा त्रास होऊन फुफ्फुसाचा रोग होण्याची शक्यता असते. म्हणून हे गोठे उंचावर बांधणे आवश्यक असते. गोठ्याची दिशा ठरविताना दक्षिण – उत्तर अथवा पूर्व – पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी व संध्याकाळी कोवळी सूर्यकिरणे गोठ्यात प्रवेश करून गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. तसेच उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सूर्यकिरणांमुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते. प्रत्येक शेळीला १० ते १२ चौ. फूट जागा मिळाली तरी त्यांना आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरते. गोठ्याच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. व ह्या जागेत शक्यतो सुबाभूळसारखी झाडे लावावीत. ह्या झाडांचा उपयोग सावली, शुद्ध हवा या व्यतिरिक्त त्याच्या पाल्याचा वापर शेळीचे खाद्य म्हणून करता येतो व त्यामुळे व्यवस्थापनाचा खर्च कमी होण्यास मदत होते.

बंदिस्त शेळीपालन करत असताना गोठ्यात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था पाणी पुरवठा करणाऱ्या सिमेंटच्या अर्धगोल नळ्यांद्वारे करावी. ह्या नळ्या चुन्याने रंगविल्यास पाण्यातून होणाऱ्या जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. वयोमानाप्रमाणे शेळ्यांची / बोकडांची व लहान करडांची व्यवस्था केल्यास व्यवस्थापनाला सोईचे जाईल. आजारी व ज्या शेळ्यांमुळे इतर शेळ्यांना रोग होऊ शकेल अशा शेळ्यांना ताबडतोब वेगळ्या कराव्यात. नवीन जन्माला आलेल्या करडांना मृत्यू येण्याचे प्रमाण जास्त असल्याकारणाने त्यांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे.

बंदिस्त पिंजरे बांधत असताना टप्याटप्याने माद्या व नर विकत घ्यावेत व बांधकामात जास्त खर्च न करता उपलब्ध असलेल्या सामानातून अशी घरे बांधावीत. शंभर शेळ्यांच्या कळपाकरिता चार वेगवेगळे बंदिस्त पिंजरे बांधावेत. हे पिंजरे जमिनीपासून ३ -४ फूट उंच असावेत. यात दिड ते दोन फूट भिंत बांधून त्यावर बांबूनी विणलेली जाळी लावावी. शेळीच्या पायाखाली बांबूचे अर्धे कापलेले तुकडे एकमेकांपासून अर्धा इंच अंतरावर ठेवावेत म्हणजे शेळ्यांचे मलमूत्र या फटीतून जमिनीवर पडेल. त्यामुळे ओलावा राहणार नाही मलमूत्राचा येणाऱ्या अतिशय उग्र वासापासून सुटका होऊ शकेल. शक्यतो अशा पिंजऱ्यात लोखंडी जाळ्या वापरू नयेत. कारण शेळ्यांना माणसाप्रमाणे धनुर्वात होऊ शकतो. पंचवीस शेळ्यांकरिता ३० फूट लांब व १५ फूट रुंद जागा मुबलक होते. हिरवा चारा व सुके गवत चारही कोपऱ्यावर २ ते ३ उंचीवर गवत टांगून ठेवावे. यामुळे शेळ्यांना नैसर्गिक खाण्याच्या पद्धतीचा वापर करण्याची संधी प्राप्त होऊन शेळ्या पोटभर खाऊ शकतात. शेळ्यांना २०० ते २५० ग्रॅम खुराक द्यावा लागतो. गव्हाणीसाठी ५-६ इंच खोली आवश्यक आहे व अशा गव्हाणी दिड ते दोन फूट उंचीवर ठेवल्यास खुराकाची नासाडी न होता शेळ्या व्यवस्थितपणे खाऊ शकतात.

शेळीपालनाचे फायदे लक्षात घेऊन त्याविषयीचे प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेऊन त्यातील प्रमुख बाबी, शेळ्यांना होणारे रोग, त्यांचे प्रजनन, त्यांची देखभाल, त्यांच्या आहाराविषयी, निवासाविषयी संपूर्ण सखोल माहिती मिळविणे आवश्यक ठरते. शेळीपालन उद्योग हा अतिशय फायदेशीर उद्योग आहे. शेतीवर आधारित उद्योग म्हणून हा उद्योग अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही तो मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो.
आणि पावसाळ्यातील शेळ्यांची निगा

पावसाची शक्यता असल्यास रात्री त्यांना पावसापासून निवारा द्यावा. अन्यथा पावसामुळे जनावरे रोगांना बळी पडण्याची शक्यता असते.
गोठा शक्यतो कोरडा ठेवावा, गोठ्यात दररोज चुन्याची भुकटी टाकावी.
जर शेळी – मेंढी मेली असेल तर अशा मृत प्राण्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावणे गरजेचे आहे.
मेलेल्या शेळ्या मेंढ्या खोल खड्यात चुन्याची भुकटी टाकून पुरून टाकाव्यात.
शेळ्या – मेंढ्याना घटसर्पाची लस द्यावी.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम