शेतकरी चिंतेत : सोयाबीन पिकावर येलो मोझँक रोगाचा प्रादुर्भाव

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ११ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक भागातील शेतकरी सोयाबीनची मोठी लागवड करीत असतात पण सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आला आहे. परभणी जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर येलो मोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मोझँकमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. ऑगस्ट महिन्यात एका महिन्यापेक्षा अधिक प्रदिर्घ पाऊसाचा खंड पडला होता. यातच काही दिवसानंतर सोयाबीनवर येलो मोझॅक ‌रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

पाण्यामुळे आणि मोझँक व्हायरसमुळे शेतकरी दुहेरी संकटात आहेत. सोयाबीन पीक बाधीत होऊन सोयाबीनच्या शेंगात तेलबिया परिपक्व झाल्या नाहीत. तसंच शेंगांच्या पापड्या झाल्या आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च निघणेही अवघड आहे.

सध्या सोयाबीन कापणी करुन मळणी केली जात असताना बाधीत ठिकाणी एकरी दोन क्विंटल सोयाबिन उत्पादन होत आहे. तरीही अद्याप पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही. उर्वरित पंच्याहत्तर टक्यासाठी देखील महसुल, कृषि खाते आणि पीक विमा कंपनीचें प्रतिनीधी उत्पादन क्षमता तपासणी करताना दिसून येत नाहीत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दुष्काळ जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे. तसेच पीक विमा कंपनीने देखील नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे. तसंच भरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम