आल्यापासून सुंठ निर्मिती प्रक्रिया

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.

 

सुंठ तयार करण्याच्या पद्धती
मलबार पद्धती

या पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवतात. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात. बंद खोलीत आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्‍यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.

 

सोडा व खास मिश्रण पद्धती

या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईड (कॉस्टिक सोडा)ची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम