देशात जीएम मका लागवडीला परवानगी द्यावी; पोल्ट्री उद्योगाची केंद्राकडे मागणी!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ एप्रिल २०२४ | गेल्या वर्षभरात मकाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर वाढला आहे. ज्यामुळे पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला सध्या मका टंचाईला सामोरे जावे लागत आहे. येत्या काही काळात मका पिकाचे महत्व वाढणार आहे. मका टंचाई दूर करण्यासाठी काही देशांनी जीएम मका, सोयाबीन शेतीला परवानगी दिली आहे. अलीकडेच चीनने देखील जीएम मका लागवडीला परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात देखील जीएम मका लागवडीला परवानगी देण्यात यावी. अशी मागणी पोल्ट्री उद्योगाकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

 

पोल्ट्री फेडरेशन या देशातील आघाडीच्या संघटनेसह कंपाउंड लाइव स्टॉक फीड मैन्युफैक्चर्स एसोसिएशन आणि पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी केंद्र सरकारकडे जीएम मका लागवडीला देशात परवानगी देण्याची मागणी केली आहे. तसेच, सध्या जाणवणारी मका टंचाई कमी करण्यासाठी मका आयातीवरील शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्यात यावे, असे देखील या संस्थांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. मका आयातीबाबत या संघटनांनी या आधीही केंद्र सरकारला पत्र लिहिले असून कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संघटनेने देखील जीएम मका लागवडीला परवानगी देण्याची मागणी आधी केलेली आहे.

भारतामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जीएम मका उत्पादनाला परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. तसेच, मका आयात शुल्कात कपात करण्याची देखील मागणी वारंवार केली जात आहे. परंतु, सरकारकडून या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे सरकारने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास येत्या काळात देशातील पोल्ट्री उद्योग धोक्यात येण्याची शकयता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम