छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील शेतकऱ्यांना सध्या त्यांच्या टोमॅटोला प्रति कॅरेट (२० ते २२ किलो) ५५० ते ६०० रुपये असा उच्च दर मिळत आहे. व्यापारी थेट शेतावर येऊन टोमॅटो खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
करंजखेडचे शेतकरी सुखदेव भालचंद्र लेंबे यांनी ३० गुंठे जमिनीवर शाहू गावरान जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. विहिरीत पाणी कमी असतानाही त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून टोमॅटो पिकाची यशस्वी वाढ केली. या लागवडीसाठी त्यांना ७५ ते ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे.
काही दिवसांपूर्वी टोमॅटोला फक्त १०० ते २५० रुपये प्रति कॅरेट दर मिळत होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र आता टोमॅटोला दुगुना दर मिळत आहे. शनिवारी बहिरगाव येथील व्यापारी शुभम राऊत यांनी लेंबे व रावसाहेब वळवळे यांचे टोमॅटो ५५० ते ६०० रुपये प्रति कॅरेट दराने खरेदी केले. हे टोमॅटो नांदेडच्या बाजारात पाठवले जात आहेत.
सुखदेव लेंबे यांना पहिल्या तोडणीत ३०, दुसऱ्या तोडणीत ४५ आणि तिसऱ्या तोडणीत ९० कॅरेट टोमॅटोचे उत्पादन मिळाले. आतापर्यंत त्यांनी १६५ कॅरेट टोमॅटो विकून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. अजून तीन ते चार तोडण्या बाकी असून, असाच दर मिळाला तर ३० गुंठ्यात दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम