संत्रा पिकावरील डिंक्या ,पायकुज व मुळकुज रोगाचे व्यवस्थापन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I शेतकरी बंधूंनो आपण संत्रा पिकावरील डिंक्या तसेच पायकुज व मुळकुज या रोगाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

डिंक्या : डिंक्‍या हा बुरशीजन्य रोग असून या रोगात झाडाच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना दिसतो. झाडाच्या सालीचा रंग लालसर होऊन शेवटी काळपट होतो. रोगट लाल साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात. या रोगाचा प्रसार संत्रा झाडाला ओलित करणाऱ्या वाहत्या पाण्यामुळे होतो.

व्यवस्थापन योजना : (१) संत्रा पिकाला ठिबक सिंचनाने ओलित करावे.

(२) ठिबक सिंचन पद्धत उपलब्ध नसल्यास संत्रा पिकाला डबल रिंग पद्धतीने पाणी द्यावे म्हणजे झाडाच्या बुंध्याभोवती दोन वर्तुळाकार आळे तयार करून त्यामधून बांगडी पद्धतीने पाणी द्यावे व संत्र्याच्या बुंध्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.

(३) संत्रा बागेत पावसाळ्यात जास्तीचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व जास्तीचे पाणी संत्रा बागेत साचले तर संत्रा झाडाच्या दोन ओळीत चर खोदून पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी.

(४) संत्रा लागवडीकरता उंच डोळा बांधणीच्या कलमाचा वापर करावा.

(५) रोगग्रस्त झाडाची साल निर्जंतुक केलेल्या धारदार पटाशी ने काढून किंवा चाकूने काढून रोगट भाग एक टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट च्या द्रावणाने म्हणजे दहा लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम पोटॅशियम परमॅग्नेट टाकून तयार केलेल्या द्रावणाचा वापर करून निर्जंतुक करून घ्यावा व त्यावर बोर्ड मलम (Bordo paste) १:१:१० लावावा.

(६) Cymoxnil 8 percent + Mancozeb 64 percent डब्ल्यू पी या संयुक्त बुरशीनाशकाची 25 ग्रॅम अधिक 50 मिली जवस तेल अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडाच्या परिघामध्ये मिसळावे किंवा झाडाच्या परिघात आळवणी करावी

(७) संत्रा झाडाच्या बुंध्यावर बोर्ड मलम (Bordo paste) १:१:१० दोन वेळा म्हणजे पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात व पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात लावावा. तसेच पोटॅशियम फॉस्फोनेट या रसायनाच्या 30 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दोन फवारण्या कराव्यात पहिली फवारणी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तर दुसरी फवारणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी

(८) हा रोग दिसताक्षणी ट्रायकोडर्मा हरजियानम अधिक ट्रायकोडर्मा ॲस्पिरिलम अधिक सुडोमोनास फ्लोरन्स 100 ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड एक किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघात जमिनीतून द्यावे.

पाय कुज व मूळकूज : या रोगात झाडाच्या कलम युतीचा भाग जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. नंतर हा प्रादुर्भाव खोडावर व मुळावर पसरतो. या रोगात झाडाची मुळे कुजतात व बुंधाची साल कुजते . पाने निस्तेज होऊन शिरा पिवळ्या पडतात व फळेही गळतात.फाद्या आणि खोडाचा भाग काळसर दिसू लागतो. मोठ्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण हळूहळू दिसू लागते अशावेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.

व्यवस्थापन योजना : (१) या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात व व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात

(२) वर निर्देशित उपायोजना झाल्यानंतर Cymoxnil 8 percent+ Mancozeb 64 percent डब्ल्यू पी हे संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम अधिक 50 मिली जवस तेल अधिक दहा लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या परिघामध्ये मिसळावे किंवा आळवणी करावी व मातीने वाफा झाकून घ्यावा.

टीप : वर निर्देशित उपाययोजना वापरण्यापूर्वी योग्य निदान करून तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन गरजेनुसार वापर करावा

कोणतीही रसायने किंवा निविष्ठा वापरण्यापूर्वी म्हणजे कीटकनाशके बुरशीनाशके किंवा इतर निविष्ठा वापरण्यापूर्वी लेबल क्‍लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच रसायने किंवा निविष्ठांचा वापर करावा करावा.
कीडनाशके बुरशीनाशके यांचा वापर करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करणे टाळावे, प्रमाण पाळावे तसेच कीडनाशकाचा वापर करताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा वापर करावा.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम