बैलांनी नव्हे तर ट्रॅक्टरनं केला बैलपोळा !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १५ सप्टेंबर २०२३

प्रत्येक शेतकरीच्या वर्षातील महत्वाच सण म्हणून बैलपोळा साजरा केला जात असतो. नुकतेच राज्यभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या दिवशी शेतात राबून वर्षभर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलाच्या उपकाराचे पांग फेडलं जातं. दरम्यान, आता आधुनिक पद्धतीनं शेती केली जाते, त्यामुळं बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी गावात बैलांसह ट्रॅक्टरचाही पोळा मोठ्या उत्साहात भरवण्यात आला.

भंडारा जिल्ह्यात काल दिवसभर कधी मध्यम तर, कधी रिमझिम पावसानं हजेरी लावली. अशा पावसातही तमा नं बाळगता शेतकऱ्यांनी उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला. विदर्भातचं नव्हे तर संपूर्ण देशात पोळा सण साजरा केल्या जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी उत्साहात बैलजोडीची पुजा करुन पोळा सण साजरा करतात. ज्या शेतकऱ्यांकडं बैलजोडी नाही असे शेतकरी, शेतमजूर मातीचे बैल बनवून त्यांची पुजा करुन त्यांना नैवेद्य दाखवून कृतज्ञता व्यक्त करतात.

अलिकडच्या काळात बैलांची संख्या प्रचंड रोडावली आहे. त्यामुळं शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करायला लागलेत. शेतीच्या कामासाठी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर व्हायला लागला. पोळ्याच्या सणाला बैलजोडीला साजशृंगार करुन गावातील मंदिराजवळ घेऊन जाण्याची प्रथा आहे. मंदिरासमोर आंब्याचे पानांचं तोरण बांधून त्याखाली शेतकऱ्यांनी बैलजोडी उभी करायची, भाविकांनी बैलजोड्यांची पुजा करायची, ज्याला माहिती आहे त्यांनी झडत्या (बिरवे) म्हणायच्या आणि सायंकाळी तोरण तोडून पोळा संपवायचा. त्यानंतर गावातील घरोघरी जाऊन त्यांची पुजा करुन घ्यायची अशी परंपरा सुरु असून आजही ती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
आता आधुनिकतेचा जमाना आला असून अलिकडच्या काळात बैलांची संख्या रोडावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बैलजोडी पोळ्यात घेऊन जाता येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून पोळ्यात सजविलेले ट्रॅक्टर घेऊन जाणे सुरु केले. पवनी येथील चंडिका मंदिर परिसरात सन 2019 मध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला होता. त्यानंतर कोरोना कालावधीत तो बंद झाला. मात्र, पवनीच्या ट्रॅक्टर पोळ्याची नक्कल कन्हाळगाव रस्त्यावरील सेलारी येथे करण्यात आली. तिथं हनुमान मंदीरात ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्यात आला. त्यानंतर सावरला मार्गावरील गुडेगाव येथे ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्याची प्रथा सुरू झाली. ती अद्यापही सुरुच आहे. यावर्षी धानोरी, कोदूर्ली यासह मोहाडी तालुक्यातील सतोना यासह अन्य काही गावांमध्ये बैलजोडी व ट्रॅक्टरचा संयुक्त पोळा भरविण्यात आला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम