शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान वाचविणार ‘एक कॅपॅसिटर’

बातमी शेअर करा

शेतीच्या खर्च आणी उत्पादनाचे गणित दिवसेंदिवस अधिक बिघडत चालले आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि त्यात पडणारी मानवी चुकांची भर अधिक महागात पडते. बिघडणाऱ्या गणिताला सुधारण्यासाठी आपल्या व्यवहारात यंत्र आणि तंत्रशुध्दता आणल्यास शेतकऱ्यांचे जगणे अधिक सुकर होऊ शकते. शेतातला एक विदयुत पंप बिघडला की, तो शेतातून काढून रिपेअर सेंटरला नेणे, रिवाईंडींग करणे, नेणे-आणण्याची वाहतूक, काढणे आणि बसविण्याच्या मजूरीचा खर्च, विद्युत बंद कालावधीत सिंचनाची झालेली गैरसोय याचा किमान खर्च आणि नुकसानीचा खर्च विचारात घेता तो आकडा सुमारे दहा हजाराच्या घरात जातो. तो दहा हजाराचा खर्च शेतकऱ्याला अनेक पटीने नुकसानीच्या खाईत लोटतो. तसा दहा-बीस हजाराचा आर्थिक फटका कोण्याही शेतकऱ्याला परवडणारा नसावा. आपल्या थोड्याशा हयगयीमुळे होणारे नुकसान एक विद्युत कॅपॅसिटर टाळू शकतो, कॅपॅसिटर अभावी रोहित्र जळून महावितरणचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. हा भाग वेगळाच.

विजेवर चालणारे पंप वापरणाऱ्या ग्राहकाने किंवा शेतकऱ्याने आपल्या विद्युत पंपाचा पॉवर फ़ॅक्टर 0.9 इतका कमीत कमी राखलाच पाहिजे. तसा विद्युत वितरणाचा नियम आहे. विद्युत फ़ॅक्टर 0.9 इतका राखण्यासाठी ग्राहकाने मोटारीला कॅपॅसिटर बसविणे बंधंनकारक आहे. साधारणपणे विद्युत मोटारीचा पॉवर फॅक्टर 0.5 ते 0.6 इतका असतो. कॅपॅसिटर बसविल्यामुळे पॉवर फ़ॅक्टर सुधारतो.

विद्युत मोटारचा फ़ुल लोड करंट (विद्युत प्रवाह) सर्वसाधारणे त्या मोटारीच्या क्षमतेच्या (हॉर्स पॉवरच्या) दीडपट असतो. अर्थात, दहा हॉर्स पॉवरच्या मोटारीचा फुललोड करंट पंधरा ॲम्पीअर असतो. परंतु जर सदर मोटारीचे विद्युत मंडलामध्ये (सर्किटमध्ये) योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर जोडला तर तीच मोटार फुल लोडवर चालत असतांना 15 एम्पीअरऐवजी 12 ॲम्पीअर इतकाच करंट (विद्युत प्रवाह) घेईल असे आढळून येईल. म्हणजेच कॅपॅसिटर जोडल्याबरोबर सुमारे 3 ॲम्पीअर करंट कमी घेते. या प्रमाणे जर एखादी 100 (हॉर्स पॉवर) क्षमतेची मोटार 150 ॲम्पीअर फुल लोड करंट घेत असेल तर योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर जोडल्यानंतर तीच मोटार 120 ॲम्पीअर करंट घेईल. पर्यायाने वीज वितरण रोहित्रावरही ताण पडणार नाही. त्यामुळे तो जळणारही नाही.

कॅपॅसिटर शिवाय विद्युत पंप वापरल्याने अधिक ॲम्पीअर वापर होऊन पंप अधिक गरम होतो व लवकर जळतो. आपल्याला असाही अनुभव असावा की, जसजसा विद्युत लाईनवरील लोड (लाईनचा विद्युत प्रवाह) वाढत जातो, तसतसा लाईनचा विद्युत दाब (व्होल्टेज) कमी कमी होत जातो. (म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप वाढून व्होल्टेज कमी कमी होत जाते.) अशा वेळी विद्युत मंडलामध्ये (सर्किटमध्ये) कॅपॅसिटरर्स जोडून लाईनवरील लोड तितकाच राहून विद्युत प्रवाह (करंट) मात्र कमी होतो. त्यामुळे विद्युत दाबामध्ये सुधारणा होऊन लाईनचा विद्युत दाब (व्होल्टेज) वाढतो. त्यामुळे वीज ग्राहकांना योग्य प्रमाणात विद्युत दाब मिळण्यास मदत होते.
कॅपॅसिटर हा रिऍक्टीव्ह पॉवर नियंत्रित करणारा प्रभावी घटक आहे. तो मोटारींना बसविल्याने मोटारींसह रोहित्र जळण्याचे प्रमाण नियंत्रित होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि महावितरणचीही आर्थिक हानी होणार नाही. आर्थिक हानी बरोबरोच गैरसोयही टळेल. कमी विद्युत दाबावर मोटारी पूर्ण क्षमतेने चालतील.
राज्यात एकूण वीज वापरात शेती क्षेत्राचे प्रमाण 30 ते 31 टके इतके सर्वाधिक आहे. शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण रोहित्रे महत्वाची आहेत. राज्यात सुरक्षित विजेच्या वापराअभावी शेतकऱ्यांच्या मोटारीचे जळण्याचे, नादुरुस्त होण्याचे 10 ते 12 टक्के आहे. रोहित्र जळण्याचे प्रमाणही सुमारे 10 ते 12 टाक्के आहे, यात नागरी भागातील रोहित्रांचे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांच्या आसपास म्हणजे नगण्य असे आहे. अधिकाधिक रोहित्रे ही ग्रामीण भागातील जळतात. ती नादुरुस्त होण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी महावितरणचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यास शेतकऱ्यांच्या सहकार्याचीही आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कृषीपंपाना कॅपॅसिटर लावून वीज वापर केल्यास त्यांच्या मोटारी जळण्याबरोबरच रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाणही कमी होईल. त्यातून शेतकऱ्यांचीही गैरसोय टळेल. ग्रामीण भागात शेतीसाठी 63 आणि 100 केव्हीएची रोहित्र आहेत. कॅपॅसिटरच्या वापरा अभावी, नोंदणीकृत भारापेक्षा अधिक विद्युत भाराचा वापर, रोहित्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक वीज वापराने रोहित्र नादुरुस्त होतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

नादुरुस्त होणाऱ्या रोहित्राच्या दुरुस्तीचा खर्च, वाहतुक आणि मजुरीचा विचार करता एका रोहित्रासाठी सुमारे 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. शिवाय, या साऱ्या प्रक्रियेत अनेक दिवस वाया जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आडचणी निर्माण होऊन त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे सर्व उपदव्याप टाळण्यासाठी विद्युत मोटारींना कॅपॅसिटर बसविणे अधिक फ़ायद्याचे ठरते.

विद्युत मोटारींना ऍटो स्विच बसविल्यानेही त्या जळतात. ऍटो स्विचमुळे अचानक सर्व मोटरी एकाच वेळी सुरु होतात. त्यामुळे रोहितत्रावर व मोटारीवर एकदाच लोड वाढल्याने त्या जळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ऍटो स्विचचा वापर टाळणे शेतकरी आणि विद्युत यंत्रणेच्या हिताचे ठरते. ऍटो स्विचचा वापर टाळण्याबरोबर कृषीपंपांना योग्य क्षमतेची कॅपॅसिटर बसविणे आवश्यक आहे. 3 एच पी पंपासाठी एक केव्हीएआर, 5 एचपी साठी दोन केव्हीएआर, 7.5 एचपी साठी तीन केव्हीएआर या प्रमाणार मोटारींना कॅपॅसिटर बसविणे आवश्यक आहे. कॅपॅसिटर प्रमाणीत कंपनीचे बसविल्यास त्याचा चांगला प्रभाव पडू शकतो. बाजारात त्या-त्या कंपनीनुसार कॅपॅसिटरची अत्याल्प दरात उपलब्धता आहे. कॅपॅसिटर बसविल्याने वापरण्यात येणारा वीजभार कमी होते. त्यामुळे विद्युत पंपांना योग्य दाबाने विद्युत पुरवठा होण्यास मदत होते. त्यामुळे विद्युत पंप जळण्याचे प्रमाण कमी होते. रोहित्रावरील वीजभार कमी झाल्याने रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाणही कमी होते. विजेची वितरण हानी कमी होवून वीजबिलही कमी येण्यास मदत होते. याकडे सर्वानी डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम