कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | डाळिंबात सद्यस्थितीमध्ये प्रामुख्याने मर रोगाची समस्या खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भेडसावत आहे. लक्षणे – अचानक झाडाचा शेंड्याकडील भाग पिवळा पडण्यास सुरुवात होऊन कालांतराने संपूर्ण झाड पिवळे पडून वाळून जाते. लागण झालेल्या फांदीवर फळे असल्यास फळेसुद्धा वाळून जातात परंतु न गळता तशीच झाडाला लटकलेली राहतात.रोगग्रस्त मुळे किंवा खोडाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग तपकिरी किंवा काळसर झालेला दिसतो.
मर रोग प्रादुर्भावाची कारणे :
अयोग्य जमीन – भारी जमिनीत डाळिंबाची लागवड केल्यास पाण्याचा निचरा होत नसल्याने अतिरिक्त ओलाव्याने खोडकूज व मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो
अयोग्य लागवडीचे अंतर – झाडांची जास्त दाटी झाल्यास बागेत हवा खेळती राहत नाही त्यामुळे कीड रोगास अनुकूल वातावरण निर्माण होते. पाणी व्यवस्थापनाचा अभाव – पाण्याचा अतिरेक वापर कारणीभूत. बऱ्याच वेळी सिंचनाकरिता वापरावयाचे ड्रीपर्स खोडाजवळ ठेवलेले असतात त्यामुळे जमिनीलगत खोडाजवळ सतत ओलावा राहून रोगाचा प्रादुर्भाव होतो.
बुरशीचा प्रादुर्भाव – प्रामुख्याने फ्युजेरियम व मॅक्रोफोमीना बुरशी मुळांद्वारे व त्यावरील जखमांद्वारे झाडात प्रवेश करते. यासोबतच ऑक्सिस्पोरिअम, रायझोक्टोनिया ह्या बुरशीसुद्धा मर रोगग्रस्त झाडांवर आढळतात. अन्न व पाणी वाहून नेणाऱ्या झायलम उतींमध्ये बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाचा अन्न आणि पाणी पुरवठा बंद होऊन झाडाची पाने पिवळी पडतात पुढे शेंड्याकडून संपूर्ण झाड वाळत जाते.
किड आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भाव – खोडकिडा तसेच खोडाला छिद्रे करणारे भुंगेरे आणि मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमी यांच्या प्रादुर्भावामुळे बुरशीचा झाडाच्या मुळांमध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे झाड मरते
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम