सुपारी पिकाच्या किडीवर सापडला उपाय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ |अलीकडील काळात सुपारीवर कोले रोगाचा वाढता प्रसार झाल्याचे दिसून येत आहे. या रोगामुळे संपूर्ण पीक वाया जाण्याचा धोका असतो. सध्याची झाडे उंच असल्यामुळे त्यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी करणेही अवघड असते आणि सुपारीची देखभाल करणेही कठीण होऊन बसते. त्यामुळे कमी उंचीची झाडे लावल्यास ती सुपारी उत्पादक शेतकर्‍यांसाठी निगा राखण्यासाठी लाभदायक ठरतील.

 

सुपारीची लागवड देशात सर्वत्र केली जाते. संपूर्ण जगात सुपारीचे उत्पादन भारतात सर्वाधिक होते. एका आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे 925 हजार हेक्टर क्षेत्रातून 127 हजार टन सुपारीचे उत्पादन होते. सुपारीची लागवड होणार्‍या क्षेत्रातील 49 टक्के क्षेत्र भारतातील असून, जगातील उत्पादनाच्या 50 टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. गेल्या वर्षाची आकडेवारी पाहिल्यास असे दिसते की, 632 टन सुपारीचे उत्पादन भारतात झाले आणि हे जगात सर्वाधिक होते. 187 टन उत्पादन घेऊन इंडोनेशिया जगात दुसर्‍या क्रमांकावर, तर 135 टन उत्पादन काढणारा चीन तिसर्‍या क्रमांकावर राहिला. म्यानमार (122 टन) आणि बांगलादेश (108 टन) हे देश अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले.

 

गेल्या काही वर्षांपासून सुपारीवर पडणार्‍या रोगांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आपल्याकडे विशेषतः कोकणात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते आणि अशा उत्पादकांसाठी केरळमधील कासारगोड येथील केंद्रीय रोपण पीक संशोधन संस्थेने (सीपीसीआरआय) दोन नव्या जाती विकसित केल्या आहेत. यामुळे सुपारीवरील रोगांवर नियंत्रण तर मिळेलच; परंतु जिथे सुपारीचे पीक घेतले जात नाही, तिथेही ते घेणे शक्य होईल. व्हीटीएलएच-1 आणि व्हीटीएलएच-2 नावाच्या या दोन प्रजातींवर तीन वर्षे केरळमध्ये संशोधन सुरू होते. आता त्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम