कृषीसेवक | २१ ऑक्टोबर २०२३
देशातील अनेक राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असतांना महाराष्ट्रातून मान्सून परत फिरला असून राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच वाढत आहे. अशात राज्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिट पासून थोडासा दिलासा मिळाला आहे. अशात आज राज्यात कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यासह देशातून मान्सूनने निरोप घेतला आहे. तर दक्षिण भारतात दोन दिवस ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परिणामी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तर दुसरीकडे आज मुंबई आणि गोव्याच्या किनारी भागांमध्ये ‘तेज’ चक्रीवादळ धडकणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.
आज मुंबईसह किनारी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई आणि किनाऱ्यालागच्या भागावर तेज चक्रीवादळाचं सावट ओढवत असताना अकोला जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम