कृषीसेवक| २५ ऑगस्ट २०२३ | राज्यातील शेतकरी अनेक दिवसापासून मोठ्या संकटात सापडत असून आज पुन्हा एकदा शेतकरी पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत आला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मागच्या काही दिवसापासून कोथिंबीरीच्या दराने शेतकऱ्यांना अक्षरशः रडविले आहे, अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकून दिली आहे. काही शेतकऱ्यांनी गुरांना चारली तर काही शेतकऱ्यांनी उभ्या कोथिंबीर पिकात रोटर फिरवले आहेत. दरम्यान सध्या देखील एका शेतकऱ्याने एक एकर कोथिंबिरीमध्ये रोटर फिरवल्याची माहिती समोर आली आहे
कोथिंबिरीचे भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्याने संपूर्ण एक एकर क्षेत्रावरवरील कोथिंबीरवर ट्रॅक्टरने रोटर फिरवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांधे गावच्या शेतकऱ्याने कोथिंबिरीवर रोटर फिरवला आहे. गोरखदादा आवारी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कोथिंबिरीला भाव मिळेल या आशेने कोथिंबिरी केली होती मात्र कवडीमोल दराने कोथिंबिरी विकली जात आहे. यामुळेच या शेतकऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला देखील भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. आणि आता दुसरीकडे एकाही भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामध्ये शेतकऱ्याला कोथंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता सरकारला जाग तरी केव्हा येणार? असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. दरम्यान, कोथिंबिरीला भाव मिळत नसल्यामुळे मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने कोथंबीर फुकट वाटली होती. शेतामध्ये दिवस-रात्र कष्ट करून कोथिंबीर पिकवली होती या कोथिंबीरीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र शेतकऱ्याची कोथिंबीरी बाजारामध्ये कवडीमोल दराने विकली जात होती. या गोष्टीचा संताप शेतकऱ्याला झाला असून त्याने कोथिंबीर फुकट वाटण्याचा निर्णय घेतला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम