गुलाबाच्या शेतीतून शेतकरी कमवितो इतके पैसे !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १३ ऑगस्ट २०२३ | कृषिप्रधान देश असलेल्या भारतातील शेतकरी बांधव शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने नेहमीच संकटांच्या कचाट्यात सापडला असतो. कृषी निविष्ठांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती, इंधनाच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, वाढती महागाई परिणामी वाढलेले मजुरीचे दर या सर्व पार्श्वभूमीवर शेती हा शेतकऱ्यांसाठी तोट्याचा व्यवसाय सिद्ध होऊ लागला आहे. म्हणून जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना आता शेतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. केवळ पारंपारिक पद्धतीने शेती केली तर शेतीमधून फारशी कमाई होत नाही केवळ उदरनिर्वाह भागू शकतो असे चित्र आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिकतेची कास धरण्यास सुरुवात केली आहे. आता पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल दाखवत शेतकरी बांधवांनी फुल शेती तसेच इतर काही नगदी पिकांची लागवड करण्यावर अधिक भर दिला आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातून असाच एक प्रयोग समोर येत असून जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने फुलशेतीच्या माध्यमातून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी काटे यांनी गुलाबाच्या शेतीतून लाखोंची कमाई केली आहे. त्यामुळे काटे कुटुंबीयांना गुलाबाचे काटे लाखो रुपयांचे ठरले आहेत एवढं मात्र नक्की. संभाजी काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या एक एकर शेतजमिनीत गुलाबाची शेती सुरू केली असून यातून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळत आहे.

ही शेती बारामाही उत्पादन देण्यास सक्षम असल्याने त्यांना याचा फायदा होत आहे. ते सांगतात की, त्यांनी तब्बल दहा वर्षांपासून गुलाब शेती सुरू केली आहे. इतर पिकांची शेती ही हंगामी असते मात्र गुलाबाची शेती ही बारामाही असते. यामुळे यातून मिळणारे शाश्वत उत्पादन त्यांच्या कुटुंबियांसाठी लाख-मोलाचे ठरले आहे. या गुलाबाच्या शेतीबाबत त्यांनी माहिती देताना सांगितले की, पाच फूट अंतराचे बेड तयार करून मल्चिंग वर गुलाब लागवड त्यांनी केली आहे. गुलाबाच्या दोन झाडांमध्ये अडीच फुटाचे अंतर आहे. एका एकरात जवळपास अडीच हजार गुलाबाची झाडे लावण्यात आली असून या झाडांना ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन केलं जात आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास मोठी मदत झाली आहे तसेच पिकापासून अधिकचे उत्पादन त्यांना मिळत आहे.
ते सांगतात की व्यापारी त्यांच्या बांधावर येऊन गुलाबाची फुल खरेदी करतात. हंगामानुसार दोनशे रुपये ते पाचशे रुपये प्रतिशेकडा असा दर त्यांच्या गुलाबाला मिळतो. यामुळे त्यांना यातून चांगली कमाई महिन्याकाठी होते. निश्चितच, शेतीमध्ये बदल करणे आता आवश्यक झाले असून केवळ पारंपारिक पिकांच्या शेतीवर अवलंबून न राहता फुल शेती सारख्या इतर अन्य पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हे काटे यांच्या प्रयोगातून सिद्ध होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम