राज्यातील एकमेव गाव ; या गावात शेतीला बांध नाहीच !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १२ जानेवारी २०२३ । शेतकऱ्याचे जास्त भांडण हे शेताच्या बांधावरुन होत असतात. बांधाच्या वादावरून अगदी सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याच्या बातम्या नेहमीच आपल्या वाचनात किंवा पाहण्यात येतात. महसूल, पोलीस आणि न्यायालयात सर्वात जास्त वाद देखील बांधावरुन झाल्याचे दिसते. मात्र, महाराष्ट्रात एक असे गाव आहे की जिथे शेतीला बांधच नाही. शेतील बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शिवारात आजही जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाही.

एका बाजूला राज्यात पिढ्या वाढतील तशी शेतीच्या तुकड्यांची संख्या वाढत चालली आहे. हे होत असताना बांधाचे वाद ही महाराष्ट्रासमोरची मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. मंगळवेढ्यात आजही शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. इथे शेतीच्या शिवेवरून किंवा बांधावरून कधी वादच होत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे शहर संत दामाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि संतपरंपरा असणारे शहर आहे. मंगळवेढ्यात जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला आजवर कधीच बांध घालण्याची परंपरा नाही. हे विशेष आहे. एखाद्या रोडवर सलग 15 किलोमीटरपर्यंत पाहत गेला तरी तुम्हाला बांध नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही.

मंगळवेढ्याची ओळख ज्वारीचे कोठार म्हणून केली जाते. येथील मालदांडी ज्वारीला केंद्र सरकारचे GI मानांकन देऊन तिला सातासमुद्रापार पोहोचवले आहे. अगदी 200 मीटरपर्यंत धर नसलेली काळ्याशार जमिनीतून ही कसदार ज्वारी पिकते. त्यामुळेच या शिवारातील गुळभेंडी हुरड्याला देखील काही न्यारीच चव असते. येथील काळ्या कसदार जमिनीतून केवळ एखाद्या पावसावर येणारी मोत्यासारखी पांढरी शुभ्र ज्वारी, हरभरा, करडई या पिकात औषधी गुणधर्म असल्याने याला फार मोठी मागणी असते. येथील शेतकऱ्यांनी कधीच ज्वारीचे बियाणे बाजारातून खरेदी केल्याचे ऐकिवात नाही. पिढ्यानपिढ्या शेतात आलेल्या ज्वारीतून दरवर्षी पुढच्या वर्षीच्या बियाणासाठी थोडी ज्वारी ठेवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळेच की काय या परिसरात आजारी पाडण्याचे प्रमाण अत्यंत अत्यल्प असल्याने या भागात आयसीयू सेंटर देखील नसल्याची माहिती मंगळवेढ्याचे शेतकरी अंकुश पडवळे यांनी दिली.

मंगळवेढ्यातील जमिनीला धरच नसल्याने या शेतीत बांध केलेले टीकत नाहीत. एखाद्या पावसात केलेले बांध मोडून जातात. हा पूर्वापार चालत आलेला अनुभव असल्याने या भागातील शेतकरी कधी बांधाच घालण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मग आपली जमीन केवळ नजरेवर ओळखायची कशी याचे टेक्निक देखील पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. तसे बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खून यावरून बांध नक्की होतात आणि यानंतर प्रत्येक शेतकरी आपल्या मालकीची जमीन लक्षात ठेवत असतो. याला शेजारी शेतकरी देखील कधी आक्षेप घेत नाही किंवा वाद करीत नाही.

जमीन मालकासोबत बैलाला देखील मालकाच्या जमिनीच्या खुणा माहित असल्याने तो त्याच पद्धतीने नांगरट करीत असल्याची माहिती शेतकरी भारत दत्तू आणि गुरुलिंग पावले यांनी दिली. तसेच आमच्या 10 पिढ्या शेजारी असून जमिनीचे तुकडे पडत गेले तरी आमच्यात कधी हद्दीवरून आजवर वाद झाला नसल्याचे भारत दत्तू सांगतात. आमच्यात जरी वाटण्या झाल्या तरी आम्ही कासऱ्याने किंवा पावले टाकून एकदा जमिनीची वाटणी करून देतो ती कायमची असते असे दत्तू सांगतात. तरुण पिढीला देखील या जमीन वाटण्याची पद्धत मान्य असते आणि त्यामुळं आमच्या नवीन पिढीत देखील कधी बांधावरून वादावादी होत नसल्याचे दामाजी सरगर यांनी सांगितले.
जमिनीत धर नसल्याने येथील शेतकरी कधीच या शेतात वस्ती करून राहू शकत नाहीत. तसे येणारे पीक फक्त पावसावर अवलंबून असल्यानं आपल्या शेतावर येण्यासाठी सुद्धा घरातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे दामाजी कारखान्याचे संचालक मुरलीधर दत्तू यांनी सांगितले. काळ्या मातीमुळं इथे कोणत्याही शेतात ना विहीर आहे ना बोअरवेल आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी सकाळी रानात येऊन संध्याकाळी परत जातो. पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांमध्ये असणाऱ्या या समजूतदारपणामुळं इथे कोणतेच वाद कधी होत नसल्याचे भीमराव भगरे सांगतात . निसर्गाने दिलेल्या या परिस्थितीवर येथील हजारो शेतकऱ्यांनी समजूतदारपणे मात करीत महाराष्ट्रासमोर एक आदर्श उभा केला आहे. बांधावरून जीवघेण्यापर्यंत येणाऱ्या महाराष्ट्रातील इतर सुपीक बागायती गावांनी मंगळवेढ्याचा समजूतदारपणाचा आदर्श घेतल्यास यापुढे शेतीची शिव आणि बांधावरून होणारे वाद शमणार नसले तरी नक्की कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी फक्त स्वार्थीपणाला मुरड घालून थोडा समंजसपणा धरल्यास खऱ्या अर्थाने तंटामुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम