टोमॅटो लागवडीचे आहेत अनेक फायदे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | टोमॅटोची कच्‍ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोशिंबीरीसाठी वापरली जातात. तसेच टोमॅटोच्‍या पिकलेल्‍या फळांपासून सुप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्‍युस इत्‍यादी पदार्थ बनविता येतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्‍व वाढलेले आहे.

हवामान
टोमॅटो हे उष्‍ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्‍ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अति थंडी पडल्‍यास टोमॅटोच्‍या झाडाची वाढ खुंटते. तपमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो. 13 ते 38 सेल्सियस या तापमानास झाडाची वाढ चांगली होती. फूले आणि फळे चांगली लागतात. रात्रीचे तापमान 18 ते 20 सेल्सियस दरम्‍यान राहिल्‍यास टोमॅटो ची फळधारणा चांगली होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपिन हेक्‍टरी रंगद्रव्‍य 26 ते 32 सेंटिग्रेडला तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते. तापमान, सुर्यप्रकाश आणि आद्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्‍या वाढीवर होतो. 20 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्‍वच्‍छ सुर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्‍के आर्द्रता असेल त्‍यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्‍पादन मिळते.

जमिन
टोमॅटो पिकासाठी मध्‍यम ते भारी जमिन लागवडी योग्‍य असते. हलक्‍या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्‍याचा निचरा चांगला होतो. आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पवुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्‍याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्‍यम प्रतिचा म्‍हणजे 6 ते 8 असावा.
पूर्वमशागत

शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखारणी द्यावी. जमिनीत हेक्‍टरी 30 ते 40 गाडया शेणखत मिसळावे लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 60 ते 90 सेमी व दोन रोपातील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे. खरीप व हिवाळी हंगामासाठी 90 बाय 60 सेमी अंतरावर व उन्‍हाळी हंगामासाठी 60 बाय 45 सेमी अंतरावर लागवड करावी. .
हंगाम

खरीप – जून, जूलै महिन्‍यात बी पेरावे.
रब्‍बी ( हिवाळी हंगाम) सप्‍टेबर, ऑक्‍टोबर मध्‍ये महिन्‍यात बी पेरावे.
उन्‍हाळी हंगाम – डिसेंबर, जानेवारी महिन्‍यात बी पेरावे
बियाण्‍याचे प्रमाण – हेक्‍टरी टोमॅटो पिकाचे 400 ते 500 ग्रॅम बी लागते.
सुधारीत वाण

टोमॅटोचे वाण खालीलप्रमाणे

पुसा रूबी : तीनही हंगामात घेता येते. लागवडीनंतर 45 ते 90 दिवसांनी फळे काढणीस येतात. फळे मयम चपटया आकाराची गर्द लाल रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 325 क्विंटल

पुसा गौरव : ही जात झुडूप वजा वाढणारी आहे. फळे लांबट गोल पिकल्‍यावर पिवळसर लाल रंगाची होतात. वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 400 क्विंटल
पुसा शितल : हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्‍य जात असून फळे चपटी गोल लाल रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल
अर्का गौरव : फळ गडद लाल मांसल व टिकावू असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल पर्यंत
रोमा : झाडे लहान व झाुडपाळ असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्‍याने वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 25 टन.
रूपाली, वैशाली, भाग्‍यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली डवार्फ इ. जातीची लागवड केली जाते.
लागवड

रोपे तयार करण्‍यासाठी बियांची पेरणी गादी वाफयावर करावी. गादी वाफा तयार करण्‍यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्‍या 2, 3 पाळया देऊन जमिन भुसभूशीत करावी. गादी वाफा हा 1 मी. रूंद 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा. गादी वाफयात 1 घमेले शेणखत 50 ग्रॅम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास 3 ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे. बियांची पेरणी ही वाफयाच्‍या रूंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्‍यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे. वाफयास झारीने पाणी द्यावे. बी उगवून आल्‍यानंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळीत काकरी पाडून प्रति वाफयास 10 ग्रॅम फोरेट द्यावे. वाफे हे तणविरहीत ठेवावेत. फूलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणाकरिता 10 लिटर पाण्‍यात 12 ते 15 मिली मोनोक्रोटोकॉस व 25 ग्रॅम डायथेन एम 45 मिसळून बी उगवल्‍यानंतर 15 दिवसांनी फवारावे. नंतरच्‍या दोन फवारण्‍या 10 दिवसाच्‍या अंतराने कराव्‍यात. बी पेरणीं पासून 25 ते 30 दिवसांनी म्‍हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्‍यावर रोपांची सरी वरंब्‍यावर पुर्नलागवड करावी. रोपे उपटण्‍यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्‍ध होतात. रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्‍याकाळी किंवा उन कमी झाल्‍यावर करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम