दिवाळीत कांदा उत्पादक शेतकऱ्याना बसला फटका !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २ नोव्हेबर २०२३

राज्यातील कांदा उत्पादकांना दिवाळीपूर्वी मोठा फटका बसला आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणात सातत्याने होणारे बदल तसेच दिवाळी सणानिमित्ताने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे. सरासरी कांद्याच्या दरात 800 ते 900 रुपयांची घसरण झाली आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात 800 डॉलर प्रति टन किंमत केली आहे. तसेच सरकारनं नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणला आहे. हा कांदा 25 रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा हा परिणाम कांद्याच्या दरांवर झाल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने 800 ते 900 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे दर हे चार हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गेल्या पाच दिवसात पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साधारण 35 ते 40 कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करा
#onion
Comments (0)
Add Comment