शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीनला मिळाला इतका भाव !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १० नोव्हेबर २०२३

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत होती. चालू हंगामात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचे दर 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरले होते. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील 5 हजार 451 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. तर आज वाशीम बाजार समितीमध्ये सोयाबीनची 15 हजार क्विंटल इतकी आवक झाली. राज्यात यावर्षी उशिरा दाखल झालेला मान्सून, ऑगस्ट महिन्यात मान्सूनमध्ये पडलेला खंड यामुळे यावर्षीचे सोयाबीन पीक कमालीचे धोक्यात आले. ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना एकरी उत्पादनात मोठा फटका बसला. त्याच काळात ‘येलो मोझॅक किडीचा’चा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा सोयाबीनच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊन दाण्यांची फुगवण कमी झाली.

त्यातच हंगाम सुरू झाला आणि दर घसरले. या मिळणाऱ्या दरामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणेही कठिण झाले होते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला होते. मात्र आता ऐन दिवाळीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा
#soybeans
Comments (0)
Add Comment