देगलूर तालुका कृषी कार्यालयाला बोंबाबोंब करून कुलूप ठोकले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | पीएम किसान सन्मान निधीतील त्रुटींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले असतानाही प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधीला याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. दिवाळीसारखा सण शेतकऱ्यांना अंधारात साजरा करावा लागला.शुक्रवारी (ता.२८) रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होत येथील देगलूर तालुका कृषी कार्यालयाला बोंबाबोंब करून कुलूप ठोकले.

या वेळी शेतकऱ्यांनी कैलास येसगे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिले. काँग्रेस भारत जोडो यात्रेमध्ये असून, शिवसेना बेरोजगारांचा मेळावा भरवीत आहे, तर राष्ट्रवादी आगामी निवडणुकीत मशगुल आहे. सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना तर या सर्व घटनांचा काहीही सोयरसुतक राहिलेले नाही, एकीकडे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी बांधावर असून घरी दिवाळी सारखा सण हे त्याला साजरा करता आला नाही मात्र कोणत्याच पक्षाकडून यावर आवाज उठविला जात नसल्याने प्रशासनही ठप्प झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तहसील व कृषी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी भेटले नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात बोंब ठोकून कार्यालयाला कुलूप ठोकले. शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment